कामगार मंत्र्यांच्या फोटोला मारले जोडे, शासन निर्णय फाडत मंत्री मंडळातून हकालपट्टीसाठी कामगार संघटनेचे आंदोलन

सोलापूरः इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम व इतर कामगारांना शैक्षणिक अर्थसहाय्य योजना इयत्ता ०१ ली ते १० वी, डिग्री, पीजी साठी मिळणारी शिष्यवृत्ती योजना बंद केल्यामुळे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करुन शैक्षणिक योजना पूर्ववत सुरु करा व इतर मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली पुनम गेटे येथे मंत्री श्री. फुंडकरांच्या फोटोला जोडे मारत फोटो व शासन निर्णय फाडण्यात आले.
कामगार व त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य, आरोग्य, आर्थिक, सामाजिक सुरक्षा व अन्य योजना चालू असताना अचानक कामगार विभागाच्या दिनांक १३ जुलै २०२६ च्या शासन निर्णयान्वये मंडळाने घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्देवी आणि अन्यायकारक आहे. यामुळे राज्यातील लाखो कष्टकरी कामगारांचे मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. मंडळाकडून मिळणाऱ्या मदतीवरच या कामगारांची मुले शाळा आणि महाविद्यालयांची फी, पुस्तके व इतर खर्च भागवत होती. हा लाभ बंद केल्यामुळे त्यांच्या मूलभूत शैक्षणिक अधिकारावर गदा आली आहे. मंडळाला मिळणाऱ्या उपकरातून निधी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय कारणास्तव किंवा नियम अटीचे कारण पुढे करुन कष्टकरी कामगारांचे शैक्षणिक योजना बेकायदेशीर बंद करणे अत्यंत संतापजनक आहे. यामुळे जर कामगारांच्या मुलांना प्राथमिक व उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली नाही तर कष्टकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण सोडवे लागेल, परिणामी राज्यातील बालमजुरीचे प्रमाण वाढू शकते. जे कायद्याने गुन्हा आहे. यास सर्वस्वी जबाबदार राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर हेच आहे. कामगार मंत्री श्री. फुंडकर हे कामगार मंत्रालयास पूर्ण वेळ देत नाही, कामगार आयुक्त व मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्यावर नियंत्रण नाही म्हणून त्यांची मंत्री मंडळातून तात्काळ हकालपट्टी करुन शैक्षणिक योजना पूर्ववत सुरु करा, गेल्या ६ महिन्यापासून प्रलंबित असलेले लाभाचे अर्जावर निर्णय घेऊन लाभ वितरित करा, नोंदणी व नुतणीकरणाचे अर्ज मुदतीत निकाली काढावे अशी मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद, सिध्दार्थ बोराडे, साथी छगन पंढरे, सायबन्ना तेगेळी, महेबूब शेख, कॉम्रेड एजाज शेख, अशपाक शेख, जे.एम. शिकलगर, अंगद जाधव, अशोक कांबळे, कॉ. निहाल शेख, कॉ. शरणू गुडियवरु, बाबा बागवान, कॉम्रेड ज्ञानेश्वर देशमुख, राजू जाधव, कॉ. जहीर शेख, सुगतपाल कांबळे, श्रीकांत भागवत, प्रदिप परकाळे, विजय शिकतोडे, शिवाजी कांबळे, महेश गायकवाड, जब्बार पटेल, अजीज दर्जी, महेबूब पडले, अमजत पठाण, शाहजान इनामदार, नवनाथ रणदिवे, संतोषी शिंदे, सुरेखा साबळे, अमक्का रेड्डी, घनशाम जानराव, बबन चव्हाण, सुनिता रेड्डी, प्रशांत काकडे, राजश्री पोळ, संमोष बगाडे, जितेंद्र चांदणे, पिंटू गायकवाड, अमोल कांबळे, आदी उपस्थित होते.



