खासदार प्रणिती शिंदे यांचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना निवेदन…
सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलापुरातील विमानसेवेच्या प्रश्नावर खासदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा पाठपुरावा सुरू केला आहे. सोलापुरातून लवकरात लवकर विमानसेवा सुरू व्हावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापु यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सोलापूरच्या विकासासाठी विमानसेवा अत्यावश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, तिरुपती यासारख्या प्रमुख शहरांमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सोलापूर हे ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, वस्त्रोद्योग आणि धार्मिक पर्यटन यासारख्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. परंतु या ठिकाणाहून थेट विमानसेवा नसल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. सोलापुरातील व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटक यांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सोलापुरातून मुंबई, दिल्ली, तिरुपती, बंगळुरू, आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांशी थेट विमानसेवा सुरू झाल्यास आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूरचा विकास वेगाने होईल.” सोलापूरचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान लक्षात घेता, या शहरासाठी विमानसेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी विनंती प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
* होटगी विमानतळाचा प्रश्न प्रलंबित
सोलापूर शहरातील होटगी येथील विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. काही महिन्यांपूर्वीच या विमानतळाचे नुतनीकरण करण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सोलापुरातून विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा होती. सोलापूर विमान प्राधिकरणाने काही विमान कंपन्यांशी बोलणी केली होती. यानुसार, फ्लाय 91 या विमान कंपनीने 23 डिसेंबरपासून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-गोवा या मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप कोणत्याही प्रकारची सेवा सुरू झालेली नाही. विमानतळ उड्डाणासाठी सज्ज असले तरी काही त्रुटी असल्याचे विमान कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषत: इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने विमानसेवा उशीराने सुरू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
* प्रलंबित आश्वासने आणि त्रुटी
मागील तीन वर्षांपासून सोलापुरात विमानसेवा सुरू करण्याची आश्वासने दिली जात आहेत. विमानतळासाठी अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी देखील पाडण्यात आली होती. त्यानंतर सहाच महिन्यांत विमानसेवा सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही विमानसेवा सुरू झालेली नाही. या प्रकरणाचा लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना फटका बसल्याचेही दिसून आले होते. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यापूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती, परंतु विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही.
* बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास
खासदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेऊन सोलापुरातून तात्काळ विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. तसेच, बोरामणी येथील विमानतळाचा विकास करावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे सादर केली.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री नायडू यांनी येत्या काही दिवसांत सोलापुरातून नियमित विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल व बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.