घरमालकाचा 4 विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला; घटनास्थळी रक्ताचा सडा
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका घरमालकाने 4 विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला केल्याचे समोर आले आहे. यात विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अगदी किरकोळ कारणावरून हा प्रकार घडला. मात्र, या प्रकरणी अजून गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत विचारपूस केल्याचे समजते.
सिडकोतली घटना
वाघोळा (ता. फुलंब्री) येथे चार मुले छत्रपती संभाजीनगरध्ये सैनिकी पूर्व शिक्षण घेतात. ते सिडकोमध्ये एक रूम घेऊन रहायचे. तेव्हा या मुलांमध्ये आणि घरमालकामध्ये अगदी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचे रूपांतर चाकूहल्ल्यात झाल्याचे पाहायला मिळाले.
दरवाजा उघडा म्हणून…
घरमालकाने मुलांना रूमचा दरवाजा बंद करायला सांगितले. मात्र, त्यांनी तो लगेच बंद केला नाही. आमचा स्वयंपाक सुरू आहे. तो झाल्यानंतर आम्ही दरवाजा बंद करतो, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र, यातून शब्दाला शब्द लागत गेला आणि वाद वाढला. त्यामुळे चिडलेल्या घरमालकाने चाकूहल्ला केला.
उपचार सुरू
हल्ल्यात चारही मुले जखमी झालेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल नाही. पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.