क्राईम

चोरीचे ६ डिझेल कॅन घेऊन निघालेली भरधाव कार रेलिंगला धडकून स्फोट, तीन जणांचा मृत्यू

चोरीचे ६ डिझेल कॅन घेऊन नागपूरहून शिर्डीकडे निघालेली भरधाव कार सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील सिमेंट रेलिंग डिव्हायडरला धडकली. धडक देताच कारचा स्फोट झाला व त्यापाठोपाठ डिझेल कॅनचा भडका उडाल्याने त्यात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तिसरा प्रवासी मेहकर रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला. लोणार तालुक्यातील बिबी पोलिस ठाणे हद्दीत देऊळगाव कोळ नजीक हा अपघात घडला. अपघातानंतर समृद्धी मार्गावरील मुंबई काॅरिडॉरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. अपघात एवढा भीषण होता की मृतदेहाची ओळख पटवणेही अवघड झाले होते.

या घटनेतील एका प्रवाश्याची ओळख पटली असून अजय दिनेश बिलाल हा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. हा प्रवासी कारच्या बाहेर फेकला गेला होता. दुसरबीड येथील रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. क्यूआरव्ही जवान अक्षय बावणे, कैलास आघाव, अविनाश मकासरे, रुस्तुम कुटे, इलामे, खुणारे, देशमुख यांनी कटरच्या साह्याने जळालेले मृतदेह बाहेर काढले.ॲम्बुलन्स चालक दिगंबर शिंदे, डॉ. वैभव बोराडे यांनी गंभीर जखमीला मेहकर येथे दाखल केले हाेते.

एकूण २३ डिझेल कॅनची चोरी : कार (क्र.एमएच ०२ सीआर १४५९) मध्ये ६ आणि स्कॉर्पिओमध्ये (क्र.एमएच ४६ टी ६७२२) १९ असे एकूण २३ डिझेल कॅन चोरून हे चोरटे या दोन गाड्या सोबत घेऊन निघाले होते. रस्त्यात स्कॉर्पिओ बंद पडली. चोरट्यांनी कारच्या सीटबेल्टचा वापरुन स्कॉर्पिओला टो केले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास कार सिमेंट रेलिंगला धडकून स्फोट होताच कारमधील कॅनचाही भडका उडाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून स्कॉर्पिओतील १७ आणि कारमधील ६ पैकी ३ डिझेल कॅन जप्त केल्या आहेत. कारचा स्फोट होताच स्कॉर्पिओतील ३ चोरट्यांनी पळ काढल्याचा पोलिसांना संशय आहे. तर स्विफ्ट डिझायर दूरवर थांबल्यावर त्यातील चोरट्यांनीही पळ काढला. माहिती कळताच महामार्ग पोलिस एपीआय अरुण बकाल, बिबीचे ठाणेदार सोनकांबळे, पीएसआय राजू गायकी, पोहेकॉ कलीम देशमुख, पोकॉ अरुण सानप यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी डिझेलसह जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel