छत्रपती संभाजीनगरमध्ये मंदिराबाहेरची कमान जाळली, पोलिसांवरही हल्ला…
शहराच्या नामांतराच्या महिन्याभरानंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला. रामनवमीच्या पार्श्वभूमी किराडपुऱ्यातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. काही क्षणातच परिसरात दंगल पेटली. अनियंत्रित झालेल्या गटाने पोलिसांवरही हल्ला केला. त्यांची वाहने दगडफेक करुन फोडली. या हल्ल्यात २ पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले. रात्री ११.३० वाजता सुरू झालेला हा हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता.
तणावाची पहिली ठिणगी
गुरुवारी साजरा होणाऱ्या रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मिश्र वस्तीत असलेल्या किराडपुऱ्यातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होता. येथेच तणावाची पहिली ठिणगी पेटली.
पोलिसांचे वाहन जाळले
दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला व शिवीगाळ सुरू होऊन दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. काही क्षणातच एका गटाने मंदिराच्या दिशेने दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी काही लोक मंदिरात घुसले, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वाढीव बंदोबस्त मागवला, मात्र ते येईपर्यंत जाळपोळ सुरू झाली होती. मंदिरासमोर उभे असलेले पोलिसांचे वाहन दंगेखोरांनी जाळले. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी काही धर्मगुरुंना बोलावण्यात आले. पण जमाव त्यांचेही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. काही वेळात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मात्र दंगेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवले. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडला. नंतर अग्निशमन विभागाच्या गाड्यांमधून पाण्याचा मारा करण्यात आला.
आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत रस्ता बंद
स्थानिकांच्या माहितीनुसार, जमाव हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. हा गोळीबार दोन तीन वेळा ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलिस रस्ता पोलिसांनी बंद केला. त्याशिवाय बहुतांश नागरिकांच्या घरावर दगडफेक झाली. तेथील लोकांना घराबाहेर येण्यासाठी नागरिक उद्युक्त करत होेते. ३.३० वाजेपर्यंत जमाव नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू हाेते.
खासदार इम्तियाज जलील पोहोचले घटनास्थळी
छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले.