टीम इंडियाची व्हिडीओ बनवणाऱ्याला रोहितचा ‘भन्नाट’ रिप्लाय; अय्यरला हसू अनावर, VIDEO
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजासाठी ओळखले जाते. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग दहा विजय मिळवून वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
न्यूझीलंडविरूद्धच्या उपांत्य सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी करून किवी संघासमोर धावांचा डोंगर उभारला. अय्यरच्या शतकानंतर ड्रेसिंगरूममध्ये असलेल्या हिटमॅनने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. रोहितने अय्यरची नक्कल करून सर्वांचे लक्ष वेधले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने फायनलचे तिकिट मिळवले.
दरम्यान, मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर किवी संघाला चीतपट केल्यानंतर टीम इंडिया अंतिम सामन्यासाठी अहमदाबाद येथे दाखल झाली. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ स्टेडियमकडे कूच करत असताना एक चाहता टीम इंडियाची झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता. हे पाहताच कर्णधार रोहित शर्माने भन्नाट प्रतिक्रिया दिली. रोहितचे हावभाव पाहता तो कॅमेरामनची फिरकी घेताना दिसतो. तर, त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेला अय्यरला मात्र हसू अनावर झाले.
रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, भारतीय संघ बसमधून प्रवास करत असतो. सर्वप्रथम विराट कोहलीवर कॅमेऱ्याची नजर पडते, किंग कोहलीने फोनवर व्यग्र असतो. यानंतर कॅमेरा रोहित आणि श्रेयसकडे जातो. तेव्हा रोहित व्हिडीओ काढत असलेल्या व्यक्तीला काहीतरी सांगत असल्याचे दिसते. हिटमॅन बसमध्ये असल्याने आवाज आला नाही पण त्याचे हावभाव अन् बोलण्याची शैली पाहून अय्यरला हसू अनावर झाले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रोहितसेनेची अंतिम फेरीत धडक
न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ १९ तारखेला भारतासोबत अंतिम सामना खेळेल. मोहम्मद शमीने ५७ धावा देत ७ बळी घेतले अन् संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३९७ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. ३९८ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरूवात केली. पण, मोहम्मद शमी किवी संघासाठी काळ ठरला अन् त्याने सुरूवातीलाच दोन मोठे झटके दिले. त्यानंतर डॅरिल मिचेल आणि केन विल्यमसन यांनी भागीदारी नोंदवून भारतीय चाहत्यांच्या पोटात गोळा आणला. पण, पन्हा एकदा शमी एक्सप्रेसच्या स्विंगने न्यूझीलंडचा संघ चीतपट झाला आणि भारताने ७० धावांनी विजय साकारला.