महाराष्ट्र

टीम इंडिया वर्ल्डकप हारली अन् ढसाढसा रडू लागली राष्ट्रवादीच्या आमदाराची लेक

मुंबई, 20 नोव्हेंबर : काल भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खूप महत्वाचा दिवस होता. काल रविवारी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघामध्ये वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव करत विजय मिळवला.

फायनल सामन्यापूर्वीचे सर्व सामने भारतानं जिंकले, त्यामुळे आता वर्ल्डकपच्या ट्रॉफीवरही भारतच नाव कोरणार असं सगळ्यांनाच वाटत होतं. मात्र अकराव्या सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताच्या या पराभवामुळे खेळांडूसोबतच क्रिकेट समर्थक निराश झाले. मॅच हरल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू तरळले. हे पाहून अनेक भारतीयांनाही अश्रू अनावर झाले. असाच प्रसंग राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या घरात घडला. त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांची मुलगी रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ टीम इंडिया मॅच हरल्यानंतरचा आहे. प्राजक्त तनपुरे यांची लेक आरोही भारत फायनलला पोहाेचल्याने आणि वर्ल्डकप जिंकणारच या विश्वासाने मॅच पाहण्यासाठी पूर्ण तयारीत होती. अगदी घरातील टीव्ही समोर आरोही भारतीय संघाचा निळा टीशर्ट परिधान करून मॅच कधी सुरू होते, याची सकाळपासून वाट पाहात ठाण मांडून बसली होती. पण आपण मॅच हरली आणि तिची निराशा झाली.

आपण मॅच हरताच आरोहीला अश्रू अनावर झाले आणि ती ढसाढसा रडू लागली. तर तिची आजी तिच्या शेजारी बसून तिला समजावताना दिसत आहे. हा व्हिडीओ खुद्द प्राजक्त तनपुरे यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलंय की, आजच्या पराभवाने कोट्यावधी भारतीयांची मने दुखावली. माझी कन्या आरोही त्याला अपवाद नव्हती. आरोहीने आजच्या मॅचसाठी आणि भारताच्या विश्वविजेतेपदासाठी खूप तयारी केली होती. पण शेवटी खेळात आणि आयुष्यात हार-जीत चालू असते. पराभव पचवून पुन्हा उभारी घ्यायची असते. भारतीय टीम पूर्ण स्पर्धेत खूप चांगली खेळली. पण आजचा दिवस आपला नव्हता. आस्ट्रेलिया टीमचे अभिनंदन!’ अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel