राजकीयमहाराष्ट्र

डॉ.आंबेडकरांच्या मिरवणुकीत गेलेल्या खा.राहुल शेवाळे यांना जनतेने हाकलले, ठाकरे गटाचा दावा

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या खासदार राहुल शेवाळे यांना गद्दार म्हणत शिवसैनिक व भीमसैनिकांनी पिटाळून लावले, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. तसेच, या घटनेचा व्हिडिओही जारी केला आहे.

मात्र, खासदार राहुल शेवाळे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे की, एका व्हिडिओसह माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी माहिती समाज माध्यमांवर पोस्ट केली जात आहे. मुळात तसे काहीही घडले नाही. विरोधकांचे हे घाणेरडे राजकारण आहे.

ठाकरे गटाचा दावा काय?

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनात घटनेविषयी माहिती देताना म्हटले आहे की, चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार शेवाळे आले होते, परंतु त्यांना हजारो भीमसैनिकांनी गेटजवळच रोखून धरले. ‘तुझी लायकी नाही बाबासाहेबांना हार घालायची! चालता हो!’ असे म्हणत भीमसैनिकांनी शेवाळे यांना अक्षरश: हाकलून लावले. त्यांचा संताप पाहून शेवाळे यांना घाम फुटला. काही अनुचित घडण्यापूर्वीच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या घटनेच्या धास्तीने नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या उद्यानातील आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला.

खासदार राहुल शेवाळे काय म्हणाले?

चेंबूरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ज्या ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ट्रॉलीमध्ये मी उभा होतो. त्यावेळी सुजात आंबेडकर यांच्या समर्थकांनी त्यांना आणि अमन आंबेडकर यांना ट्रॉलीमध्ये घेण्यासाठी आग्रह धरला. ट्रॉलीमध्ये माणसांची सख्या मर्यादित ठेवावी लागते, अन्यथा दुर्घटना होऊ शकते. त्यावेळी मी सुजात आंबेडकर यांना ट्रॉली मध्ये येण्यासाठी सांगितले आणि माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून मी स्वतः हुन ट्रॉली मधून खाली उतरलो. कोणीही मला खाली उतरण्यास सांगितले नव्हते.

गद्दारांना थारा नाही, भीमसैनिकांनी ठणकावल्याचा दावा

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फेसबूकवर अपलोड करत ठाकरे गटाने म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात हजारो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. गुरुवारी रात्री 9.30च्या सुमारास स्थानिक खासदार राहुल शेवाळे हे सुद्धा तिथे आले. बाबासाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते पुढे जात असतानाच भीमसैनिकांनी त्यांना रोखले. त्यांना पुष्पहार अर्पण करण्यास मनाई करत गद्दारांना येथे थारा नाही, असे ठणकावले. भीमसैनिकांचा रुद्रावतार पाहून शेवाळेंबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांचीही तारांबळ उडाली. सुरक्षेचा विचार करून तिथून माघारी जाणेच योग्य असल्याचे पोलिसांनी शेवाळे यांना सांगितले. या घटनेचे वृत्त कळताच उद्यानाच्या परिसरात काही मिनिटांतच हजारो भीमसैनिकांची गर्दी झाली. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ केली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel