तरुणीला परीक्षा केंद्रात जाऊन मारहाण, तरुणाविरुद्ध गुन्हा…
शहरात राहणाऱ्या एका तरुणीचा पाठलाग करुन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे एका तरुणाने तरुणीला म्हटले. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीचा पाठलाग करुन ती परीक्षेसाठी गेली असता परीक्षा केंद्रावर जाऊन तिला मारहाण केली. इतकेच नाहीतर परीक्षा केंद्राबाहेर तरुणीचे वडील उभे होते. त्यांनाही या ‘मजनू”ने शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली.
ही घटना सोमवारी (दि. ८) घडली असून, तरुणीच्या तक्रारीवरुन तरुणाविरुद्ध राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल वानखडे (२२, रा. जेवडनगर, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. २७ फेब्रुवारी २०२३ पासून तरुणी कॉलेजमध्ये ये-जा करताना राहुल तिचा पाठलाग करत होता. दरम्यान, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे तो तरुणीला म्हणाला. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला.
त्यामुळे त्याने तरुणीला यापूर्वी थापडाने मारहाण केली होती. दरम्यान, ८ मे २०२३ रोजी तरुणीची परीक्षा असल्यामुळे ती शहरातील एका परीक्षा केंद्रावर पोहोचली. त्यावेळी या मजनूने तिचा पाठलाग करुन थेट परीक्षा केंद्र गाठले आणि वर्गात जाऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण केली तसेच तिच्या अंगातील कपड्यांची ओढाताण केली. यावेळी तरुणीचे वडील परीक्षा केंद्राबाहेर थांबले होते, राहुल वानखडे याने त्यांनाही शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली तसेच तरुणीला त्या ठिकाणी पुन्हा ओढाताण करुन खाली पाडले आणि थापांनी मारहाण केली.
या प्रकारानंतर तरुणीने तत्काळ राजापेठ पोलिस ठाणे गाठून राहुलविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी राहुल वानखडेविरुद्ध विनयभंग करणे, मारहाण करणे, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.