तुकाराम नारायण विप्र ह्यांना पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर
श्रीसंत साहित्य सेवा संघातर्फे देण्यात येणारा पुरुषोत्तम पुरस्कार यंदा तुकाराम नारायण विप्र, कोल्हापूर ह्यांना येत्या रविवारी २ जून २०२४ रोजी दुपारी साडेपाच वाजता चैतन्यभुवन उपासना मंदिर, ज्ञान प्रबोधिनी, मोदी, सोलापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.
संत साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना संस्थेचे वतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून संस्थेचे मार्गदर्शक वै. दा. का. तथा भाऊ थावरे ह्यांच्या आठव्या पुण्यतिथीदिनाच्या पूर्वसंध्येला ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रू पाच हजार सन्माननिधी, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुधाकर देशमुख ह्यांनी सांगितले.
तुकाराम विप्र हे महाराष्ट्र बँकेचे निवृत्त अधिकारी असून पंढरपूरच्या विप्र दत्त मंदिराचे मठाधिपती आहेत. त्यांनी आजवर एकोणीस ग्रंथ लिहिले असून त्यात ज्ञानेश्वरी भावातरंग,रामकथा भावसुगंध,एकनाथ महाराज हरिपाठ विवरण आणि विप्र घराण्याचे मूळ पुरुष संत तुकाविप्र अभंगगाथा, त्यांचे अद्भुत चरित्र आणि कीर्तन परंपरेच्या ३५०० अभंगाचा समावेश आहे.अनेक ठिकाणी भागवत कथा, ज्ञानेश्वरी प्रवचनांचे माध्यमातून त्यांनी संत साहित्याचा प्रसार केला आहे.त्यांनी काही वर्षे सोलापूरात महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अधिकारी म्हणून सेवा रुजू केली होती.
पुरस्कार प्रदान समारंभास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सु. स.देशमुख, कोषाध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव गणेश सांगलीकर आणि सहसचिव विश्वास जतकर ह्यांनी केले आहे.