तुम्हीच शिवसेनेमध्ये भांडणे लावली. अशी कामे शरद पवार करत नाहीत, छगन भुजबळांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
तुम्हीच शिवसेना फोडली. तुम्हीच शिवसेनेमध्ये भांडणे लावली. अशी कामे शरद पवार करत नाहीत, असेस प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच असे वक्तव्य केले होते की, ‘त्या’ एका माणसामुळे दोन भावांमध्ये भांडण सुरु असून शिवसेनेच्या फुटीसाठीसुद्धा ते कारणीभूत आहेत. त्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले. ते नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले की, ‘शिवसेनेत जी फूट पडली, त्यामागे कुणाचा हात आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. दोन भावांमध्ये आम्ही नाही तर तुम्ही भांडणे लावली. हेदेखील सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. शरद पवार असे काम कधीही करत नाहीत.
देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण होऊ नये
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीजीऐवजी सुप्रीम कोर्टाची समिती अधिक योग्य ठरेल, असे म्हटले आहे. तसेच, अदानींना लक्ष्य केल्याचे वाटते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत दिली. त्यावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले की, आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करु नये. त्यांची आपली बदनामी होता कामा नये. अशीच भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. पूर्वी आम्हीही टाटा, बिर्ला यांच्यावर टीका करायचो. मात्र, आता लक्षात येते की, त्यांनी आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातही हजारो कोट्यवधी रुपयांचे काम केले. त्यामुळे उद्योपतींचे खच्चीकरण होता कामा नये, अशीच भूमिका शरद पवारांनी मांडली.
अदानींशिवाय इतरही अनेक मुद्दे
छगन भुजबळ म्हणाले की, एका उद्योगपतीचा मुद्दा किती ताणून धरायचा?याचाही विचार केला पाहीजे. संसदेचे पूर्ण अधिवेशन या एकाच मुद्द्यावर गेले. देशात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे, असे शरद पवारांचे म्हणणे आहे.
शिंदेंनी भक्तीभावाने अयोध्येला जावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्याला जात आहेत. यावर छगन भुजबळ म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी भक्तिभावाने अयोध्याला जावे. केवळ राजकारणासाठी अयोध्येला जाऊ नये. आम्ही तर संतांकडून ऐकले आहे की, जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अयोध्येस जाण्यापासून कोण रोखणार? आताच जातच आहेत तर त्यांनी भक्तिभावाने जावे.