दक्षिण तालुक्यातील सर्व प्रकल्प मार्गी लावणारः आ. सुभाष देशमुख
दक्षिण तालुका समृद्ध गाव अभियान कार्यशाळा संपन्न

जनतेने जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्यासाठी कटिबद्ध आहे. बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊन मी काम करणारा मी आहे. आपल्याकडे कसदार जमीन, मुबलक पाणी आहे आता गरज आहे योग्य दिशा देण्याची. दक्षिण तालुक्यातील पुढील पाच वर्षात अनेक प्रकल्प मार्गी लावून तालुका मॉडेल करायचा मानस आहे, त्यासाठी सर्वांनी साथ द्यावे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
सोलापूर सोशल फाउंडेशन आयोजित दक्षिण सोलापूर समृद्ध गाव अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा किल्लेदार मंगल कार्यालय येथे झाली, यामध्ये आ. देशमुख बोलत होते. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून समृद्ध गाव अभियान समितीचे जिल्हा प्रमुख व चिंचणीचे प्रणेते मोहन अनपट, व्याख्याते व खेडचे उपसरपंच नागेश कोकरे, हणमंत कुलकर्णी, नामदेव पवार, रामप्पा चिवडशेट्टी, डॉ. चनगोंडा हविनाळे, संगप्पा केरके, राम जाधव, अतुल गायकवाड आदी उपस्थित होते.
आ. देशमुख पुढे म्हणरले, जिल्ह्यात समृद्ध गाव करीत असताना तालुका समृद्ध करणे आवश्यक आहे. दक्षिण तालुक्यातील पुढील पाच वर्षात देगाव जलसेतू, धुबधुबी तलाव, वडापुर बॅरेजस, भीमा-सीना जोडकालवा, मंद्रूप एमआयडीसी, सीना नदीवरील ब्रिज कम बंधारे, जलसंधारण माध्यामतून तलाव, नाला खोलीकरण करून पडलेल्या पावसाचा थेंब वाचवण्यासाठी काम करणे. शाळा दर्जेदार करून शाळांचा गुणवत्ता वाढवणे व शैक्षणिक स्तर उंचावणे. शेतकर्यांना सर्व प्रकारची मदत करून तालुक्यामध्ये कृषीक्रांती करणे आदी कामे करायची आहेत. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ.
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पर्यटन वाढीसाठी संधी या विषयावर मोहन अनपट यांनी मनोगत व्यक्त केले. चिंचणी च्या विकासात आ.देशमुख यांचे योगदान मोठे असून त्यांच्या मार्गदशनाखाली मोठे काम सुरु आहे, असेही ते म्हणाले. नागेश कोकरे यांनी समृद्ध गाव अभियान आराखडा व अमलबजावणी या विषयवार मार्गदर्शन केले. सर्व लोकप्रतिनिधीनि सर्व शासकीय योजनांची माहिती जाणून घेत त्यांची प्रभावी अमलबजावणी करणे, गावचा समृद्ध आराखडा तयार करा, समिती तयार करा, वित्त आयोगाचा आराखडा सक्षम बनवा, आपला गाव व जिल्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन केले. प्रास्ताविक हणमंत कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा.विजयकुमार बिराजदार, यांनी मानले.



