दहावीचा पेपर सुटल्यावर तरुणी विद्यार्थिनींचा राडा
नाशिकमध्ये दहावीचा पेपर सुटल्यानंतर मुलींमध्ये तुफान राडा झाला. कॉलेजच्या गेटसमोरच तरुणी एकमेकींना भिडल्या. झिंज्या ओढत एकमेकींना अक्षरशः लोळवले. नळावरच्या भांडणालाही मागे टाकेल, असे प्रताप केले.
मुलींमधल्या भांडणाचे कारण समजू शकले नाही. मात्र, या साऱ्या प्रकरणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. कॉलेजमधील हाणामारीचे लोन हे हायस्कूल पर्यंत जाऊन पोहचल्याचे समोर येत आहे.
फ्री स्टाईल हाणामारी
नाशिक शहरातील सातपूर परिसरात असलेल्या एका विद्यालयाच्या बाहेर दहावीत शिकणाऱ्या तरुणी किरकोळ कारणाहून दहावीचा पेपर सुटल्यानंतर आपापसात भिडल्या. भर रस्त्यावर या तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. त्यामुळे रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली. यातल्या अनेकांनी या हाणामारीचे मोबाइलमध्ये व्हिडिओ शुटींग केले. विशेष म्हणजे नाशिकमध्ये यापूर्वीही विद्यार्थिनींमध्ये असे हाणामारीचे प्रकार घडलेत. सुप्रसिद्ध अशा भोसला मिलटरी स्कूलच्या विद्यार्थिनींनी टवाळखोरांना यापूर्वी चांगलाच चोप दिला होता.
सोशल मीडियावर व्हायरल
सातपूरमधल्या विद्यार्थिनींमधील हाणामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यापूर्वीही नाशिक शहरात तीन ते चार वेळेस असे प्रकार घडले आहेत. किरकोळ वादावरून तुफान राडा झाला आहे. तर कधी बॉयफ्रेंडवरून तरुणी भिडल्या आहेत. मात्र, याच वेळी उपस्थित असलेल्या अनेक तरुणांनी व्हिडिओ काढून ते शेयर केल्याने जोरदार चर्चा होऊ होत असते. याबाबत शाळेकडून किंवा पोलिसांकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही.