दिवसभर हमाली, रात्री ‘भलतीच कामगिरी’; मार्केट यार्डात धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना बेड्या
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चोरी प्रकरणी जोडभावी पेठ, जेलरोड पोलीस ठाणे या दोन पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी व ट्रक चालकांनी फिर्यादी दिल्या होत्या. अखेर गुप्त माहिती मिळाल्यानंतर दोघा हमालांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मार्केट यार्डातून व आजूबाजूच्या परिसरातून चोरी केलेले ३२ मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. जोडभावी पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तपास सुरू असून आणखीन मुद्देमाल जप्त करणार आहे. अक्षय सीताराम कांबळे ( वय २२ वर्ष, रा. इंदिरा नगर सोलापूर ), इम्रान शब्बीर इनामदार ( वय २४ वर्ष, इंदिरा नगर, सोलापूर ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दोघे पोलिसांच्या हाती लागताच मार्केट यार्डात येणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी व ट्रक चालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
दिवसभर हमाली करायचे अन् रात्री जबरी चोरी
अक्षय कांबळे व इम्रान इनामदार हे दोघे मार्केट यार्डात हमाली करत होते. दिवसभर हे दोघे बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांवर आणि ट्रक चालकांवर नजर ठेवून असायचे. रात्रीच्या सुमारास मार्केट यार्डात मुक्कामास असलेले शेतकरी व ट्रक चालक गाढ झोपेत असताना अचानक हल्ला करून भीतीदायक वातावरण निर्माण करत होते. त्यांच्या जवळ असलेले मोबाइल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढत होते. दररोज एक ते दोन जबरी चोऱ्या करत होते. जेलरोड पोलीस ठाण्यात आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात एक दिवसाआड भा.द.वि ३९२ प्रमाणे गुन्हे दाखल होत होते.
पोलिसांना मिळाली दोघांची माहिती
सोलापूर मार्केट यार्डात वेगवेगळ्या ठिकाणी खबऱ्यांना कामाला लावले होते. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार वर्णन केलेले दोन संशयित ८ मार्च २०२३ ला सोलापूर मार्केट यार्डात घुटमळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जोडभावी पेठ पोलिसांच्या डीबी पथकाने ताबडतोब अक्षय व इम्रानला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन अधिक तपास केल्यावर अक्षयने ताबडतोब ३२ मोबाइल काढून दिले. हे पाहून पोलीसही चक्रावले. यानंतर वरिष्ठांना माहिती देत दोघा संशयितांना सोलापूर येथील कोर्टात हजर करण्यात आले. सध्या दोघे संशयित हे न्यायलायीन कोठडीत आहेत.
घरची परिस्थिती हलाखीची म्हणून हमालीसोबत चोरीचा जोडधंदा
अक्षय कांबळे व इम्रान इनामदार या दोघा संशयितांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मार्केट यार्डात हमाली केल्याशिवाय घर चालणे कठीण होते. हमालीतून म्हणावे तितके उत्पन्न किंवा मजुरी मिळत नसल्याने या दोघांनी हमालीसोबत जबरी चोरीचा जोडधंदा सुरू केला होता. शेतकऱ्यांना व ट्रक चालकांना टार्गेट करून जबरी चोरी करत होते. या दोघांना अटक करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. अखेर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, एपीआय व्ही. एच. पवार, पीएसआय ताकभाते, श्रीकांत पवार, खाजप्पा आरेनवरू, भारत गायकवाड, शीतल शिवशरण, सचिन बाबर, सुरेश जमादार, अयाज बागलकोटे आदींनी केली.