नवजात बालकांची खरेदी-विक्री…
मुंबईच्या उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅम्प नंबर तीनच्या कंवरराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये नवजात अर्भकांची विक्री होत असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नवजात अर्भकांची याठिकाणी लाखो रुपयांना खरेदी-विक्री होत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
महालक्ष्मी नर्सिंग होमच्या डॉ. चित्रा चैनानी यांची नवजात अर्भकांची विक्रीची एक टोळी बनवली होती. बाळांच्या खरेदी आणि विक्रीचे काम या टोळीच्या माध्यमातून चालत असे. या प्रकरणात आरोपी डॉ. चित्रा चेनानी यांच्यासह 5 महिला दलालांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डमी ग्राहकांच्या मदतीने भंडाफोड
उल्हासनगरच्या या रुग्णालयात असला प्रकार सुरु असल्याचे समाजसेवकाच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी डमी ग्राहकांना डॉ. चित्रा चेनानी यांच्याकडे महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये पाठवले. आणि अशाप्रकारे डमी ग्राहकांच्या मदतीने या प्रकरणाचा भंडाफोड करण्यात त्यांना यश आले.
रंगेहाथ पकडले
नाशिकहून आलेल्या एका 22 दिवसाच्या बाळाला डमी ग्राहकाला विकण्याचा घाट या डॉक्टरांनी घातला होता. या 22 दिवसाच्या लहानग्या जीवाची किंमत 7 लाख ठरवण्यात आली होती. या बाळाला डमी ग्राहकाला विकताना ठाणे क्राईम ब्रांच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याचप्रमाणे मुली आणि मुलांचे वेगवेगळे दर या महिला डॉक्टरने ठरवलेले होते.
रंगेहाथ पकडल्यानंतर सर्व आरोपींविरुद्ध कलम 370 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे रॅकेट कशाप्रकारे चालते? याचा सूत्रधार कोण आहे? असे अनेक धागेदोरे यात तपासले जात आहेत.