पत्नीची पतीसह तिघाजनांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळीची फिर्याद मुंबई उच्च न्यायालयातून रद्दबातल
पायल विनायक गाजूल वय 34 रा मिरज ता मिरज, जि. सांगली हीस जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पती विनायक मुरलीधर गाजुल, सासू वर्जेश्वरी मुरलीधर गाजूल, चुलत सासरा विजय शिवाजी गाजूल, दीर नितीन मुरलीधर गाजूल सर्व रा. दत्तनगर सोलापूर यांचे विरुद्ध दाखल असलेली फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक व एन.आर.बोरकर यांनी रद्द केली.
या हकिकत अशी की, यातील फिर्यादी पायल व आरोपी विनायक यांचा प्रेम विवाह 2011 साली झाला होता, त्यानंतर पती विनायक व त्याच्या घरचे लोकांनी पायल हिस वारंवार जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करून माहेरहून गाडी व घर घेण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शारीरिक व मानसिक जाचहाट केला, म्हणून तिने दि:-03/06/2023 रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे, सांगली येथे वरील सर्वांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती.
त्यावर विनायक गाजूल व त्याच्या घरच्यांनी दाखल असलेली फिर्याद ही रद्द व्हावी म्हणून ऍड.रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचीकेच्या सुनावणीच्या वेळेस ॲड रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, जातीवाचक शिवीगाळीची घटना ही सार्वजनिक ठिकाणी झालेली नाही व त्यास कोणताही स्वतंत्र असा साक्षीदार नाही, त्यामुळे ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या तरतुदी अंतर्गत जातीवाचक शिवीगाळ केलेले कलम हे लागू होत नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी जातिवाचक शिवीगाळी अंतर्गत दाखल असलेल्या कलमाची फिर्याद रद्द केली.
यात आरोपीतर्फे ऍड रितेश थोबडे तर सरकारतर्फे एम एम देशमुख यांनी काम पाहिले.