पत्नी सासरी नांदायला येत नाही म्हणून जावयाने केला सासूचा खून…
वसमत येथील झेंडाचौक भागात कौटूंबिक वादातून जावयाने सासूचे दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना सोमवारी (दि.8) पहाटे साडेचार वाजता घडली आहे. पोलिसांनी आरोपी जावयास ताब्यात घेतले आहे. शेवंताबाई वंजे (75) असे मयत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील कविता यांचा विवाह श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी बाण येथील बाबासाहेब सिनगारे (48) याच्या सोबत झाला होता. त्यांना एक पाच वर्षाची मुलगी आहे. मात्र मागील चार वर्षापासून त्यांचे वाद होऊ लागले होते. त्यामुळे बाबासाहेब हा कविताला मारहाण करीत होता. त्यामुळे कविता तिच्या मुलीसह वसमत येथे माहेरी राहण्यासाठी आली होती. त्यानंतरही तो कविताकडे येत होता.
अशी घडली घटना
दरम्यान, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता तो वसमत येथे आला होता. मात्र त्याच्या मारहाणीच्या भितीपोटी कविता तिच्या बहिणीकडे वाखारी येथे निघून गेली. आज पहाटे चार वाजण्या्च्या सुमारास बाबासाहेब सिनगारे व त्याची सासु शेवंताबाई यांच्यात वाद सुरु झाला. पत्नी कविता सासरी नांदायला येत नाही या कारणावरून त्याने शेवंताबाई यांना मारहाण सुरु केली.
डोक्याला गंभीर दुखापत
त्यानंतर त्यांच्या डोक्याला धरून डोके ओट्यावरील दगडावर आदळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर प्रकार कळाल्यानंतर कविता देखील वाखारी येथून तातडीने वसमत येथे आल्या. या घटनेमध्ये जखमी झालेल्या शेवंताबाई यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.
गुन्हा दाखल
वसमतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक भिंगारे, उपनिरीक्षक सुरेश भोसले, जमादार गजानन भोपे, भगीरथ सवंडकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन बाबासाहेब सिनगारे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.