महाराष्ट्रराजकीय

पोलिसांनी सामनाच्या कार्यालयात येऊन धमकावले:संजय राऊतांचा आरोप, म्हणाले- देवेंद्र फडणवीस 40 खोक्यांखाली दबलेत, म्हणून दबावात

पोलिसांनी सामनाच्या कार्यालयात येऊन दमदाटी केली. मी नसताना कर्मचाऱ्यांना धमकावले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावरुन त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली.

कर्मचाऱ्यांना दमदाटी केली

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, मला जी धमकी आली होती त्याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी सामनाच्या कार्यालयात येऊन तिथे काम करणाऱ्यांना दमदाटी केली. त्यावेळी मी तिथे नव्हतो. मी नाशिकला गेलो होतो. धमकी प्रकरणी पोलिसांना माझा जबाब घ्यायचा होता. मात्र, मी नाशिकला चाललो आहे. तेथून आल्यावर तुम्हाला सर्व सांगेल, अशी माहिती मी पोलिसांना दिली होती. तरीही पोलिस सामनाच्या कार्यालयात आले.

देवेंद्र फडणवीसांवर 40 खोक्यांचा दबाव

पुढे संजय राऊत म्हणाले, पोलिसांनी सामनाच्या कार्यालयात घुसून जी दमदाटी केली त्याबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार नाही. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री 40 खोक्यांखाली चिरडून काम करत आहेत. चाळीस खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस दबावात काम करत आहेत.

फडणवीसांना भेटणार नाही

संजय राऊत म्हणाले, मी नाशिकमध्ये आहे हे माहित असूनही पोलिस माझा जबाब घेण्यासाठी म्हणून सामनाच्या कार्यालयात आले. पोलिसांकडे आधीच काहीतरी लिहिलेले कागद होते. त्यावर कर्मचाऱ्यांच्या जबदस्तीने सह्या घेण्यात आल्या. मी हा सगळा प्रकार पोलिस आयुक्तांना कळवणार आहे. मी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिणार आहे. मात्र, फडणवीसांना भेटणार नाही. कारण 40 खोक्यांखाली दबल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

शिंदेंच्या बंडाची कुणकुण होती

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडाबाबतही संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केले. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे बंड करणार, अशी कुणकुण आम्हाला लागली होती. तशा चर्चाही होत होत्या. मात्र, त्यानंतरही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बऱ्याचवेळा चर्चा झाली होती. त्यावेळी मी कुठल्याही परिस्थिती पक्षाशी बेईमानी करणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

शिंदे विश्वासू सहकारी होते

पुढे संजय राऊत म्हणाले, मी पक्षनिष्ठा बाळगेन, असे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. एकनाथ शिंदे हे आमचे विश्वासू सहकारी होते. मात्र, ते भलतेच वागले. त्यांच्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. तरीही त्यांनी तसे वागून दाखवले. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्यामागेही कोणत्या महाशक्तीचा दबाव होता, हे जगाला समजले आहे. तसेच, माझ्यावर सध्या अनेक गुन्हे दाखल केले जात आहेत. पण, मी घाबरत नाही, याचा पुनरुच्चारही संजय राऊत यांनी केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel