प्रभाग 20 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे मोहसीन शेख यांचा घराघरांतून जोरदार प्रचार…

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून प्रचाराला मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून प्रत्येक प्रभागात जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत.
प्रभाग क्रमांक २० मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मोहसीन शेख उर्फ नेता हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्यांनी आपल्या प्रचाराला आक्रमक सुरुवात केली आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेत विश्वास निर्माण करण्यावर मोहसीन शेख यांचा भर दिसून येत आहे.
आज प्रभाग क्रमांक २० मधील विष्णूनगर, विजयलक्ष्मी नगर, सुमय्या नगर, शिवगंगा नगर ३ व ४ या परिसरात मोहसीन शेख यांनी होम टू होम प्रचार केला. घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आपल्या विकासात्मक भूमिकेची माहिती दिली तसेच परिसरातील मूलभूत समस्या जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वीज आणि नागरी सुविधा या विषयांवर नागरिकांनी आपली मते मांडली.
यावेळी बोलताना मोहसीन शेख म्हणाले की, “एकदा मला संधी द्या, पुढील पाच वर्षे मी तुमच्या सोबत उभा राहीन. प्रभागातील प्रत्येक समस्या माझी स्वतःची समजून काम करीन.” विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
होम टू होम प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी मोहसीन शेख यांच्या प्रचाराला पाठिंबा दर्शवला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होणार असून प्रभाग क्रमांक २० मध्ये लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत…



