प्लॉट जागेच्या फसवणूक प्रकरणी बिल्डर व डेव्हलपर यांना न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला – अँड रियाज एन. शेख

स्वस्तामध्ये प्लॉट देण्याचे अमित दाखवून तब्बल ८ लाख रुपये स्वीकारून प्लॉट जागा न देता व पैसेही परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी करणकोट असोसिएट्स डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन चे सविता बालकृष्ण करनकोट व संकेत बालकृष्ण करनकोट यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री आर. जे. कटारिया साहेब यांनी फेटाळून लावला.
घटनेची थोडक्यात हाकिकत अशी की,
फिर्यादी विनोद हेरू राठोड वय 35 वर्ष, धंदा- शेती, मूळ राहणार लमान तांडा, सोलापूर हे त्यांच्या पत्नी व मुलाबाळांसह शेती करून त्यामधून आलेले पीक मार्केट यार्ड मध्ये विकून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालवितात. फिर्यादी यांची मुले-मुली हे लहान असल्याने तसेच लमान तांडा येथे शिक्षणाची चांगली सोय नसल्याने मुलांच्या पुढील आयुष्याचा व भविष्याचा विचार करून सोलापूर शहरालगतच एखादा प्लॉट घेऊन तिथे कुटुंबीयासह राहण्याचा विचार करून प्लॉट जागा पाहत होते.
दरम्यान अक्कलकोट रोड वरील कुंभारी जवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर करणकोट असोसिएट्स डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन यांच्या गेनसिद्ध नगर या नावाने प्लॉटिंगचा जाहिरातीचा बोर्ड पाहून त्यांचे कोंडा रेसिडेन्सी हिरा-मोती टॉवर, रंगराज नगर येथील कार्यालयामध्ये जाऊन फिर्यादीने सदर डेव्हलपर्स सविता करणकोट व त्यांचा मुलगा संकेत करणकोट यांची भेट घेऊन विचारणा केली व त्यांच्या सांगितल्याप्रमाणे प्लॉट क्रमांक 174 हा पसंत करून सदर प्लॉट जागेच्या व्यवहारापोटी ५ लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा १ महिन्याने ३ लाख रुपये दिले परंतु काही दिवसानंतर फिर्यादी यास प्लॉटची जागा ही कमी असल्याचे व तेथे अज्ञात इसमाने पत्राचा शेड मारल्याचे दिसून आल्याने त्याने बिल्डर्स व डेव्हलपर्स यांना भेटून विचारणा केली असता त्यांनी आज उद्या करत टाळाटाळ केली व फिर्यादी विनोद राठोड यांना कोणत्याही प्रकारे प्लॉट जागा खरेदी दिली नाही व अनेक वेळा रक्कम परत मागून सुद्धा रक्कम ही परत दिली नाही. त्यानंतर काही दिवसांनी करणकोट असोसिएटचे कार्यालय देखील बंद दिसले व फोन करून सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने सदर करनकोट असोसिएट्स बिल्डर्स अँड कन्स्ट्रक्शन चे प्रोप्रायटर सविता बालकृष्ण करनकोट व संकेत बालकृष्ण करनकोट यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 822/ 2024 अन्वये भादवि कलम 420, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर दाखल गुन्ह्यामध्ये अटक होऊ नये म्हणून आरोपींनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी सत्र न्यायाधीश श्री आर जे कटारिया यांच्या कोर्टामध्ये झाली सदर प्रकरणांमध्ये मूळ फिर्यादीतर्फे अॅड. रियाज एन शेख यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून सदर जामीन अर्जास तीव्र हरकत घेतली तसेच युक्तीवादामध्ये सरकारी वकील प्रकाश जन्नू यांनी व अँड रियाज शेख यांनी युक्तिवाद करून सदरची घटना अत्यंत गंभीर आहे. अलीकडील काळामध्ये गोरगरीब लोकांना, कष्टकरी लोकांना, शेतकरी लोकांना स्वस्तामध्ये प्लॉट जागा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. बिल्डर्स व डेव्हलपर्स हे लोकांना भुरळ घालून त्यांच्या अज्ञान पणाचा व त्यांची आर्थिक गरिबीचा फायदा घेऊन बनावट कागदपत्रे, नकाशे व लेआउट दाखवून केवळ पावती पुस्तकावर बुकिंग घेत आहेत. सदर गुन्ह्यांमधील आरोपी यांनी अनेक लोकांना फसविल्याची शक्यता नाकारता येत नाही आरोपींच्या ताब्यातून पावती पुस्तक, सदर प्लॉट जागे संदर्भातील सर्व कागदपत्रे तसेच फसवणुकीची रक्कम जप्त करणे अत्यंत गरजेचे आहे, सदर फिर्यादी यांना आरोपींच्या वतीने तक्रार मागे घेण्याकरिता दमदाटी करण्यात येत असून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे आरोपींचा जामीन फेटाळून लावण्याची विनंती केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश श्री आर जे कटारिया यांनी आरोपी बिल्डर्स व डेव्हलपर्स सविता बालकृष्ण करनकोट व त्यांचा मुलगा संकेत बालकृष्ण करनकोट यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
सदर प्रकरणांमध्ये आरोपी बिल्डर्स व डेव्हलपर्स यांच्या वतीने अँड. वरदाळे तर मूळ फिर्यादीच्या वतीने अँड. रियाज एन शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले