भर उन्हात लोटांगण, पहा पूर्ण प्रकरण…
वर्धा शहरालगत असलेल्या साठोडा मार्गावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हे महाविद्यालय हिंगणघाट शहरामध्ये उभारण्यात यावे, या मागणीसाठी हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ते शाम इडपवार यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता कडक उन्हात कारंजा चौकातील गांधी पुतळ्यापासून तर आमदार समीर कुणावार यांच्या घरापर्यंत लोटांगण आंदोलन केले.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यास स्थानबद्ध केल्याने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जात आहे. हिंगणघाट शहरांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याबाबत शहरातील अनेक संघटना नेते व स्थानिक जनता आक्रमक झाली असून, श्याम इडपवार यांना लोटांगण आंदोलन करू न देता स्थानबद्ध केल्याने हिंगणघाट शहरामध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हिंगणघाट शहराच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यासाठी लोटांगण आंदोलन होते. मात्र हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे गजू कुबडे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाचे विधानसभा प्रभारी प्रवीण उपासे यांनी या घटनेचा निषेध केला.
आमदारांना सद्बुद्धी येवो
हिंगणघाट शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी हिंगणघाट शहरच नव्हे तर समुद्रपूर, सिंदी रेल्वे मतदार संघातील प्रत्येक नागरिक आग्रही आहे. श्याम इडपवार यांच्या लोटांगण आंदोलनास स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने व प्रशासनाने उधळून लावणे ही बाब अतिशय निंदनीय असून आम्ही प्रशासनाचा व पोलीस प्रशासनाचा निषेध करतो, त्याचप्रमाणे आमदारांना सद्बुद्धी येवो हीच प्रार्थना करतो. - अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस.