महाराष्ट्र

मंदिरात पुजारी अर्धनग्न नसतात का? त्यांनीही सदरा घालावा- छगन भुजबळ

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना वस्त्रसंहिता लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे हा मूर्खपणा आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

पुजारी अर्धनग्न नसतात का?

आज पत्रकार परिषदेत यावर भूमिका मांडताना छगन भुजबळ म्हणाले, मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे. मंदिरात जाणाऱ्या शाळकरी मुलांसाठीही अशी वस्त्रसंहिता लागू करणे मूर्खपणाचे आहे. मंदिरात जे पुजारी असतात ते अर्धनग्न नसतात का?, असा सवाल भुजबळ यांनी केला. तसेच, आतमध्ये उघडेबंब असणाऱ्या पुजाऱ्यांनी प्रथम सदरा घातला पाहीजे. त्यांनी गळ्यात तुळशी माळ घातली तरी ते पुजारी आहेत, हे ओळखू येऊ शकेल, असे छगन भुजबळ म्हणाले.

संसदेत धार्मिक विधी नको

दरम्यान, काल नव्या संसदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या धार्मिक विधीवरही छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली. छगन भुजबळ म्हणाले, संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. राम मंदिर, शिव मंदिरात धार्मिक विधी केल्या असता तर त्याला काहीच हरकत नव्हती. मात्र, सर्व देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकशाहीच्या मंदिरात असे करणे चुकीचे होते.

मोदींनी जे केले, त्यामुळे मनाला वेदना

छगन भुजबळ म्हणाले, मोदींनी जे केले, ते मनाला वेदना देणारे होते. लोकशाहीत आपण नव्हे तर जनता राजा असते, याचे भान असायला हवे. आपण जे करतोय जे जगही पाहत आहे, हेदेखील कळत नाही का. देशासाठी एवढा महत्त्वाचा कार्यक्रम वेगळ्या प्रकारे करता आला असता.

जागा वाटपाची चर्चा प्रसारमाध्यमांत नको

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून तसेच पुणे लोकसभा कोण लढवणार?, यावरून मविआत धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार या दोन्ही नेत्यांनी या जागेवर दावा सांगितला आहे. त्यावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले, जागावाटपाची चर्चा मीडियात करण्याची गोष्ट नाही. तिन्ही घटक पक्षांना विश्वासात घेऊन याबाबत आम्ही चर्चा करू. तसेच, कर्नाटकमध्ये भाजपचे जे पाणिपत झाले आहे, त्यावरून ते निवडणूक घेणार की नाही?, हे तर आधी स्पष्ट होऊ द्या, असा चिमटाही छगन भुजबळांनी भाजपला काढला. निवडणुकांसाठी मविआ कधीही तयार आहे, असेही भुजबळ म्हणाले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel