‘मविआ’ म्हणून सर्व पक्षांनी एका विचाराने काम करण्यावर झाली चर्चा
भाजपला अनुकूल वक्तव्ये करणाऱ्या शरद पवारांच्या खेळीमुळे अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्रीच ‘सिल्व्हर ओक’वर धाव घेतली. तिथे उद्धव, शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व संजय राऊत या चौघांमध्ये सुमारे सव्वातास खलबते झाली. आता या विशेष भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला असला तरी चर्चेचा अजेंडा वादग्रस्त मुद्द्यांबाबतचाच असल्याची माहिती दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसचा सहभाग नव्हता. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलेले असताना संजय राऊत, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, आपापल्या पक्षाची भूमिका वेगवेगळी असली तरी महाविकास आघाडी म्हणून त्यातील सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावे या मताशी आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आमचे ठरले असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
मविआत सगळे आलबेल-राऊत
संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ अशी बैठक झाली. बैठकीत राजकीय घडामोडींवर, भविष्याची दिशा ठरवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सकारात्मकचर्चा झाली. मविआचे ऐक्य अबाधित ठेवणे हा चर्चेचा अंजेडा होता. महाविकास आघाडीबाबत जाणुनबुजून गैरसमज पसरवले जात आहेत. महाविकास आघाडी घट्ट आहे. काँग्रेसशीही आमचा संवाद सुरू आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांमध्ये चांगला संवाद आहे. तसेच, काँग्रसचे महासचिवही येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
नात्यातला ओलावा महत्त्वाचा
सुप्रिया सुळे ठाकरे-पवार भेटीवर म्हणाल्या, मी या बैठकीत उशीरा सहभागी झाले. माझी मुलगी इंग्लंडवरुन आलेली आहे. ती पुढे काय करणार, तिचे करियर आमच्या मुलांच्या भविष्याबाबत चर्चा झाली. कौटुंबिक विषयांवर यावेळी बोलणे झाले. मी पूर्णवेळ त्यांच्या चर्चेत नव्हते. माझी आणि उद्धवजींची ताडोबावर चर्चा झाली. मला नात्यातला ओलावा मला महत्त्वाचा वाटतो.