महाविकास आघाडीत कोणालाही फरफटत आणायचा आमचा हेतू नाही – नाना पटोले
महाविकास आघाडीत कोणालाही फरफटत आणायचा आमचा हेतू नाही. लोकशाही व्यवस्था संपवण्याचे काम केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार करत आहे. याविरोधात आमची लढाई सुरू आहे. जे सकारात्मक या युद्धात असतील, ते आमचे सोबती आहेत, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केले.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्याने महाविकास आघाडी टिकणार की नाही, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी व्यक्त केलेली जाहीर नाराजी आणि त्यांना चोंबडेपणा करू नये हा दिलेला सल्ला. या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्त्व आले आहे.
लढाई प्रत्येक स्तरावर
नाना पटोले यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की,आम्हाला कोणाला जबरदस्तीने फरफटत न्यायचे नाही. लोकशाही व्यवस्था संपवण्याचे पाप नरेंद्र मोदी यांचे केंद्रातले सरकार करत आहे. त्या विरुद्ध आमची लढाई आहे. काँग्रेस ती लढाई प्रत्येक स्तरावर लढत आहे. त्याचे परिणामही आम्हाला भोगावे लागत आहेत.
गांधींमागे लावली ईडी
आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना वारंवार ईडीच्या चौकशीसाठी बोलावले जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या त्रासाच्या पुढे काँग्रेस जात आहे. आम्हाला कोणालाही फरफटत न्यायचा कार्यक्रम नाही. भाजपच्या विरोधातली आमची लढाई आहे. कारण ते देशहिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे आम्हाला कोणालही फरफटत आणायचे नाही. जे सकारात्मक या युद्धात असतील, ते आमचे सोबती आहेत.
सभा संपल्या नाहीत
नाना पटोले पुढे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे सगळीकडे धिंगाणा सुरू आहे. अस्मानी संकट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गारासह पाऊस येतो आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जी काही अवस्था आहे, त्यावर प्रकाश टाकण्याची गरज आहे. निसर्गाने महाराष्ट्रात सगळी वाताहत करून ठेवली आहे. आणि त्याच्यावर राज्य सरकार काही बोलायला तयार नाही. आम्ही परवा राज्यपाल महोदयांकडे गेले होतो. हे नैसर्गिक वातावरण जे निर्माण झालेले आहे. त्यावर आमची बैठक होणार आहे. त्यामुळे वज्रमूठ सभा संपल्यात असे समजू नका.