“माझ्या रक्तात काँग्रेस आहे” – बाबा मिस्त्री; महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खंबीर पाठिंबा…

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नई जिंदगी चौकात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
सभेत बोलताना बाबा मिस्त्री यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली. ते म्हणाले, “मी काँग्रेसचाच आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस आहे. मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काँग्रेसमध्येच राहणार आणि काँग्रेसच्या उमेदवारांसाठीच काम करणार.” त्यांच्या या ठाम वक्तव्यामुळे सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारी आघाडी असून या निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. “दोन हात, दोन तुतारी” असा नारा देत त्यांनी मतदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, नई जिंदगी परिसरातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने मतदान करते आणि यावेळीही महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा मला विश्वास आहे. या जाहीर सभेत मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सभेमुळे परिसरात राजकीय चर्चांना चांगलाच उधाण आले आहे…



