railwayमहाराष्ट्रसोलापूर बातमी
माढा रेल्वे स्थानकावर आता रेल्वे आरक्षण केंद्र सुरु…
प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सेवेत नेहमी सज्ज असते. सोलापूर रेल्वे स्थानकासह शेजारील अनेक छोट्या मोठ्या स्थानावरील प्रवाश्यांच्या सेवेसाठी सोलापूर रेल्वे विभाग नेहमी कार्यरत असते. प्रवाश्यांची वाढती मागणी लक्षात घेता आता प्रशासनाने माढा रेल्वे स्थानकावर आरक्षण तिकीट काउंटर (पीआरएस) उपलब्ध करून दिले आहे.या आरक्षण काउंटरच्या माध्यमातून आरक्षण आणि तात्काळ अश्या प्रकारचे तिकीट आता या काउंटर वरून काढणे शक्य आहे.
आठवड्यातील सोमवार ते शनिवार रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत व रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ हे तिकीट आरक्षण काउंटर प्रवाश्यांसाठी खुले राहणार आहे. या आरक्षण काउंटरमुळे माढा आणि शेजारी असणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक छोट्या मोठ्या गावांतील प्रवाश्यांची सोय होणार आहे.तसेच त्यांना रेल्वे आरक्षण काढण्यासाठी आता दूरवर जाण्याची गरज भासणार नाही.
“माढा आणि शेजारील अनेक गावातील रेल्वे प्रवाशांना पूर्वी रेल्वे आरक्षण तिकीट काढण्यासाठी कुर्डुवाडी येथे जावे लागत होते, परंतु आता माढा येथे रेल्वे आरक्षण काउंटर सुरु झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. त्यामुळे या रेल्वे आरक्षण केंद्र या सेवेचा वापर जास्तीत जास्त प्रवाश्यांनी करावा आणि आपला प्रवास निश्चित करावा” असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. योगेश पाटील यांनी केले आहे.