मुलगी जन्मल्यावर झेडपी देत आहे एक लाख रुपये
सोलापूर : मुलगी जन्माचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘लेक लाडकी अभियान” सुरू केले आहे. या योजनेतून मुलीला एक लाख रुपये दिले जात आहेत. झेडपीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जात आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण विभागाने या वर्षात 767 मुलींना या योजनेचा लाभ दिला आहे. काय आहे ही योजना? जाणून घेऊयात. महाराष्ट्र शासनाने ‘लेक लाडकी अभियान” ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या प्रत्येक पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे शासनातर्फे ही रक्कम दिली जाते. मुलगी जन्मल्याबरोबर पाच हजाराची तिच्या नावे बँकेत ठेव ठेवली जाते. त्यानंतर ती पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये दिले जातात. सहावीत गेल्यानंतर 7 हजार तर अकरावीत गेल्यावर 8 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर तिला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये दिले जातील. अशाप्रकारे मुली जन्माचे स्वागत करण्यासाठी शासनातर्फे एक लाख रुपये दिले जात आहेत. पहिल्या व दुसरी मुलीसाठीच ही योजना लागू आहे. दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी फक्त जवळच्या अंगणवाडीत संपर्क साधा व ऑनलाईन पोर्टलवर ही माहिती भरा. सोलापूर शहर व ग्रामीण भागातील मुलींसाठी ही योजना लागू आहे. यासाठी पित्याचे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.