“रोड क्या तुम्हारे बाप का है क्या” म्हणत नगरसेवक पुत्रासह दोघांना रिक्षा चालकांनी केली मारहाण रिक्षाचालकांची निर्दोष मुक्तताः- अॅड. रियाज एन शेख
फिर्यादी नागनाथ मरीगंगा कंटीकर वय 25 वर्ष हे त्यांचे मित्र बिपिन सूर्यकांत पाटील, सिद्राम फकीराप्पा करली सर्व राहणार- घोंगडे वस्ती, सोलापूर यांच्यासह मोटार सायकलवर लग्नकार्य करून परत घराकडे येत असताना संगमनगर रिक्षा स्टॉप समोर एक रिक्षा रोडवरच उभी होती त्यावेळी फिर्यादींनी रिक्षा चालकास रिक्षा रोडच्या बाजूला घेण्यास विनंती केली असता त्यावेळी रिक्षा चालकाने “रोड क्या तुम्हारे बाप का है क्या छिनाल के” असे म्हणून शिवीगाळ केली त्यावेळी फिर्यादी त्यांना शिव्या का देता असे विचारले असता तेथील रिक्षा चालकांनी गोळा होऊन फिर्यादीला व त्यांच्यासह बिपिन पाटील व सिद्राम करली यांना दगडाने व लाकडाने बेदम मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील अंगठी काढून घेतली व फिर्यादी व त्यांच्या मित्रांना जखमी केले. सदर प्रकरणी फिर्यादी नागनाथ मरीगंगा कंटीकर यांनी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने दिनांक 11 डिसेंबर 2017 रोजी आरोपी जावेद अजमुद्दिन शेख, युनूस अजमुद्दिन शेख, तबरेज अब्दुल रहीम सगरी सर्व रा- मुळेगाव रोड, मोमीन नगर, सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 711/2017 भा.द.वि कलम 327, 323, 143, 147, 148, 149, 504 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सी एस वाबळे यांनी आरोपींच्या विरुद्ध सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते. सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक एम रेडकर साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी, घटनास्थळ पंच, जखमी साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासिक अधिकारी असे एकूण ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. सदर खटल्याच्या अंतिम युक्तीवादावेळी आरोपीच्या वतीने युक्तिवाद करत असताना घडलेली घटना ही आरोपींनीच मारहाण केल्याचे सबळ पुरावे नाहीत, तसेच सदर घटनेमध्ये वैद्यकीय पुरावा साबित झालेला नाही, तसेच साक्षीदारांच्या व फिर्यादीच्या उलट तपासामध्ये व जबाबांमध्ये अनेक विसंगती असून फिर्यादी व साक्षीदार हे एकमेकांचे मित्र आहेत, तसेच आरोपींच्याकडून घटनेमध्ये वापरलेले हत्यार जप्त झालेले नाही, त्यामुळे आरोपींना निर्दोष मुक्त करण्याची मागणी व युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री विनायक एम. रेडकर यांनी आरोपी नामे जावेद अझमुद्दीन शेख, युनूस अजमुद्दिन शेख, तबरेज अब्दुल रहीम सगरी, सर्व राहणार- मुळेगाव रोड, मोमीन नगर, सोलापूर यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले.
सदर प्रकरणांमध्ये आरोपी तर्फे अँड. रियाज एन शेख यांनी काम पाहिले तसेच सरकार पक्षा तर्फे श्री ए.आय. कोकणी यांनी काम पाहिले.