लोकसभेसाठी राज्यातील आदिवासी कोळी जमातीकडं मतदान मागताना उमेदवारांची होणार दमछाक!
आमच्या समाजातील मतदार विचारणार ‘हे’ 15 प्रश्न : गणेश अंकुशराव
पंढरपुर (प्रतिनिधी) : सध्या संपुर्ण देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहु लागलेय, प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असुन आलिशान गाड्यातून फिरणारे पुढारी गल्ली-बोळात पायपीट करताना आढळुन येत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासुन महाराष्ट्रातील अनेक समाज बांधव आरक्षणासाठी व अनेक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आढळुन आले, महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमात बांधव सुध्दा विविध आंदोलनं करुन आपल्या जातीच्या दाखल्यासह विविध समस्यांचा पाढा शासनासमोर वाचताना आढळला परंतु शासनाने अद्यापही या समाजाच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी पावलं उचलली नाहीत.
त्यामुळे आता निवडणुक काळात विविध राजकीय नेते जेंव्हा आदिवासी कोळी जमात बांधवांच्या घरासमोर मताचं दान मागण्यासाठी येतील तेंव्हा त्यांना याची जाणीव करुन देण्यासाठी आम्ही प्रश्नावली तयार केली असुन समाजातील प्रत्येक मतदार आता या नेत्यांना हे सर्व प्रश्न विचारतील, अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली आहे. पुढीलप्रमाणे आम्ही 15 प्रश्नांची प्रश्नावलीच तयार केली असुन ‘हे राज्यातील आदिवासी कोळी मतदारांनो तुम्ही तुमच्याकडं आलेल्या नेत्यांना हे सर्व प्रश्न विचारा! असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
आदिवासी कोळी जमात बांधव पुढील प्रश्न विचारणार!
आदिवासी कोळी ला महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी ,टोकरे कोळी, अनुसूचित जमाती यादीमध्ये 28, 29 ,आणि 30 ,क्रमांकावर आरक्षण असून का मिळत नाही ?, न्यायालय अनुसूचित जमातीचे दाखले व वैधता देते तर सरकार का देत नाही ?, तुम्ही आमच्या समाजाचा प्रश्न लोकसभेमध्ये ,विधानसभेमध्ये का उपस्थित केला नाही ?, तुम्ही आदिवासी कोळी समाजाच्या उपोषणास तुमच्या पक्षाचे सर्वश्रेष्ठ पदाधिकारी यांनी का भेट दिली नाही ?, आम्ही तुम्हाला का मतदान करावे ? , तुम्ही आमच्या समाजासाठी काय केले ? , 2014 ते 2024 या दहा वर्षात तुम्ही देता की जाता या मोर्चाची वचनपूर्ती का केली नाही ? , संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी समाजाला संख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व तुमच्या पक्षाने का दिले नाही ? , तुमच्या पार्टीने महाराष्ट्रात कोळी समाजाला किती उमेदवारी दिली आहेत ? , तुम्ही आम्हाला घटनादत्त अधिकार आरक्षण देत नाही तर आम्ही तुम्हाला मतदान का करावे ?, आदिवासी मंत्री वैधता प्रमाणपत्र व महसूल मंत्री जात प्रमाणपत्र आदिवासी कोळी समाजाला देण्याचे आदेशित करतील काय ? , आमची संख्या गृहीत धरून राजकीय शैक्षणिक नोकरी मधील आरक्षण निर्माण करण्यात येत ते आरक्षण जवळपास 1995 पासून समाजाला मिळत नाही त्याची भरपाई आपले सरकार करील का ? , आदिवासी कोळी समाजातील अधिसंख्य केलेला समाज बांधवांना शासकीय सेवांमध्ये कायम करून घेतल्या जाईल ? , आदिवासी कोळी समाजाचे अमरावती, अकोला, दर्यापूर ,बुलढाणा ,जळगाव, मुंबई, धुळे या सह संपुर्ण महाराष्ट्रात रस्ता रोको मोर्चा आंदोलने या माध्यमातून समाजाने आपल्यावरील होत असलेला अन्याय शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी शासनाने त्याची दखल का घेतली नाही ? , पंढरपुर येथील चंद्रभागेमधील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काय झाले? आदिवासी कोळी जमातीला 1950 चा पुरावा न मागता आदिवासी मंत्रालय जात वैधता वितरण का करत नाही ? , 1976 क्षेत्रबंधन हटवलेले आहे तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत ते क्षेत्रबंधन का हटवले नाही ?
गणेश अंकुशराव यांनी तयार केलेल्या या प्रश्नावलीतुन आदिवासी कोळी जमात बांधवांच्या विविध प्रलंबित समस्यांचा पाढाच नेते मंडळींसमोर वाचला जाणार असुन लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांसमोर जाणार्या उमेदवारांची आदिवासी कोळी जमातीच्या मतदारांकडे मतांचं दान मागण्यासाठी गेल्यावर यामुळे निश्चितच चांगलीच दमछाक होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.