वसंतराव काळे वाडीकुरोली व इंग्लिश स्कूल वेळापूर विजेते….
जिल्हास्तरीय शालेय खोखो स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुलांच्या गटात इंग्लिश स्कूल वेळापूर (ता. माळशिरस) व मुलींच्या गटात वाडीकुरोली ( ता. पंढरपूर) वसंतराव काळे प्रशालेने विजेतेपद पटकाविले.
नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात वेळापूरने मंद्रूपच्या ( ता. दक्षिण सोलापूर) लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा एक डाव नऊ गुणांनी पराभव केला. मुलींच्या गटात वाडीकुरोली संघाने अनगर ( ता. मोहोळ) येथील बाजीराव पाटील विद्यालयाचा पराभव केला. दोन्ही विजयी संघ पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. त्यांना जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
तृतीय स्थान मुलांच्या गटात न्यू हायस्कूल वडाळाने (ता. उत्तर सोलापूर) तर मुलींच्या गटात शिवणे ( ता. सांगोला) माध्यमिक विद्यालयाने मिळविले.
जिल्हा क्रीडा कार्यालयाने ही स्पर्धा सोलापूर सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी असोसिएशनचे सचिव ए. बी. संगवे, पंचप्रमुख शरद व्हनकडे, सहाय्यक पंचप्रमुख पुंडलिक कलखांबकर, पंचमंडळ सचिव गोकुळ कांबळे, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनच्या पंचांनी सहकार्य केले.