वाळू माफियांची महिला इन्स्पेक्टरला मारहाण…
पाटण्यात वाळू माफिया व त्यांच्या हस्तकांनी सोमवारी एका मायनिंग टीमवर हल्ला केला. जिल्हा मायनिंग अधिकारी व महिला मायनिंग इन्स्पेक्टरला त्यांनी पाठलाग करून मारहाण केली. टीम जीवाच्या आकांताने पळून गेली. पण इन्स्पेक्टर माफियांच्या हाती लागल्या. आरोपींनी त्यांना ओढत नेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच सिटी एसपी वेस्ट घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी 3 FIR नोंदवत 44 जणांना अटक करण्यात आली आहे.
डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर व मायनिंग इन्स्पेक्टरच्या मारहाणीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात दिसून येत आहे की, माफिया व त्यांचे गुंड प्रथम दगडफेक करतात. त्यानंतर मायनिंग टीमला मारहाण करतात. टीम पळून जाते. त्यावेळी एक महिला मायनिंग इन्स्पेक्टर जमावाच्या हाती लागते. ते तिला जबरमारहाण करतात. या घटनेत जिल्हा खाण पदाधिकारी कुमार गौरव व महिला खाण इन्स्पेक्टर तन्मय कुमारी गंभीर जखमी झालेत. दोघांवरही बिहटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सिटी एसपी वेस्ट राजेश कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाटणा जिल्ह्यातील बिहटा ठाणे हद्दीतील परेव गावात सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. टीमला ओव्हरलोडिंगची खबर मिळाली होती. त्यावर जिल्हा उत्खनन विभागाच्या महिला इन्स्पेक्टर आपल्या कर्मचाऱ्यांसह ओव्हरलोडिंग ट्रकची तपासणी करण्यासाठी पोहोचल्या.
त्यावेळी त्यांची ट्रक चालकांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर वाळू माफिया व त्यांच्या लोकांनी जिल्हा उत्खनन इन्स्पेक्टरसह अन्य कर्मचाऱ्यांना बिहटा-आरा एनएच मुख्य मार्गावर परेव गावालगत वीटा-दगडांनी हल्ला सुरू केला. त्यानंतर जीवाच्या आकांताने उत्खनन टीम पळून गेली. यावेळी एक महिला इन्स्पेक्टर त्यांच्या तावडीत सापडली.
150 ओव्हरलोडिंग ट्रक जप्त केले होते
यासंबंधीच्या माहितीनुसार, मायनिंग टीमने जवळपास 150 ओव्हरलोडिंग ट्रक पकडले होते. पण वाळू माफियांनी हल्ला करून ते सोडले. उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच परेव गावालगत वाळू चेकिंग पॉइंटची स्थानिकांनी जाळपोळ केली होती.
अटकसत्र सुरू -पोलिस
ठाणे प्रभारी प्रमोद कुमार यांनी सांगितले की, आम्हाला घटनेची माहिती मिळाली आहे. प्रकरण सोमवार दुपार 2 च्या सुमारासचे आहे. जिल्हा उत्खननाच्या महिला इन्स्पेक्टर आपल्या पथकासह वाळूची तस्करी रोखण्यास गेल्या होत्या. त्यावेळी वाळू माफियांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई सुरू केली. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. SSP राजीव मिश्रा यांनी घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आल्याचे सांगितले.