वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराची लाच प्रकरणात जामीनावर मुक्तता…
यात हकीकत- तक्रारदार यांची लोकसेवक पोलीस हवालदार बसप्पा शिवाजी साखरे, नेमणूक सोलापूर शहर वाहतूक शाखा, उत्तर यांनी त्यांची बुलेट थांबवून सदर बुलेटचा सायलेन्सर हा कंपनीचा नसून त्या बुलेटवर यापूर्वीचा रक्कम रु. 3000/- दंड पेंडिंग असल्याचे सांगून, पोलीस हवालदार साखरे यांनी तक्रारदाराची बुलेट ताब्यात घेऊन ती स्वतः चालवत जेलरोड पोलीस स्टेशन जवळील ट्रॅफिक डंपिंग यार्ड येथे आणून लावली.
त्यानंतर पोलीस हवालदार साखरे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या बुलेटवरील पूर्वीचा असलेला दंड रक्कम रु. 3000/- माफ करतो व सायलेन्सर बाबत देखील कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे रक्कम रु. 2000/- ची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने सदर रकमेची पावती मिळेल का?, याबाबत विचारणा केली असता, आरोपीने पावती वगैरे काही नसते, असे सांगितले व त्यानंतर त्यांच्यात तडजोड होऊन तडजोडीअंती रक्कम रु. 1500/- स्वीकारण्याचे आरोपीने कबूल केले.
आरोपी हे तक्रारदार यांच्याकडे लाच मागत असल्याचे तक्रारदार यांना खात्री झाल्याने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी पोलीस हवालदार साखरे यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवलेली. त्यानुसार लाचेबाबतची सरकारी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, आरोपी साखरे हे रक्कम रु. 1500/- ची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध पुढील लाचेसंदर्भातील सापळा रचण्यात आला. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून रक्कम रु. 1500/- ची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार साखरे यांना रंगेहात पकडण्यात आले व त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन मे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
त्यावेळी आरोपी पोलीस हवालदार बसप्पा साखरे यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर जामिनाच्यावेळी ॲड. निलेश जोशी यांच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. जी. कटारिया सो। यांनी आरोपी बसप्पा साखरे यांची रक्कम रु. 50,000/- च्या जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी यांनी काम पाहिले.