वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा प्रभाग 18 मधील एमआयएम उमेदवार सादिक नदाफ यांना जाहीर पाठिंबा

सोलापूर महानगरपालिका निवडणूक १५ ऑगस्ट रोजी होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 18 ड मधील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे अधिकृत उमेदवार सादिक नदाफ यांना वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सादिक नदाफ यांच्या उमेदवारीला अधिकृत पाठिंब्याचे पत्र प्रदान केले. शहरातील वाहतूक व्यावसायिकांचे प्रश्न, समस्या आणि त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून सादिक नदाफ यांच्यावर विश्वास व्यक्त करत महासंघाने हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहतूक व्यवसायाशी संबंधित विविध अडचणी, परवाने, दंड, पार्किंग व्यवस्था तसेच प्रशासनाशी निगडित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सशक्त व लोकाभिमुख प्रतिनिधीची आवश्यकता आहे. सादिक नदाफ हे सर्वसामान्य जनतेसह वाहतूक संघटनांच्या प्रश्नांना न्याय देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक 18 ड मधील राजकीय समीकरणांवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून, सादिक नदाफ यांच्या प्रचाराला बळ मिळाले आहे



