व्हायरल वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या आमदार राखी बिर्ला सोलापुरात; किडवाई चौकात जाहीर सभा…

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग दिला आहे. विविध पक्षांचे मोठे नेते सोलापूरमध्ये येऊन जाहीर सभा, पदयात्रा आणि बैठका घेत असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्ली विधानसभा सदस्य आमदार राखी बिर्ला सोलापूर दौऱ्यावर येत असून दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी किडवाई चौकात त्यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आमदार राखी बिर्ला या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी दिल्ली विधानसभेत भाषण करताना त्यांनी केलेले “एक तडीपार व्यक्ती देशाचा गृहमंत्री बनू शकतो आणि एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान बनू शकतो” हे विधान देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्या होत्या.
आता त्याच आमदार राखी बिर्ला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात येत असून, किडवाई चौकातील जाहीर सभेत त्या आम आदमी पार्टीची भूमिका, स्थानिक प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर थेट भाष्य करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
या जाहीर सभेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून, आम आदमी पार्टीकडून या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली असल्याचे चित्र या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे….



