” तू चीज बड़ी है मस्त मस्त ” गाणे लावून महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी डॉक्टर निर्दोष : अँड रियाज एन. शेख

जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे काम करणाऱ्या सहकारी महिला डॉक्टर वर वाईट नजर ठेवून मोबाईलवर तू चीज बडी है मस्त मस्त हे गाणे चालू करून सदर महिला डॉक्टरच्या खुर्चीजवळ येऊन तिला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याच्या आरोपातून आरोपी डॉक्टर फारूक इलाही बागवान यांची सोलापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री विनायक एम रेडकर यांनी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केले.
यात घटनेची थोडक्यात हाकिकत अशी की,
सोलापूर येथील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे काम करणाऱ्या महिला सहकारी डॉक्टरवर वाईट नजर ठेवून दिनांक 6 मार्च 2023 रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सदर महिला कर्मचारी हे त्यांच्या कार्यालयामध्ये काम करत असताना सदर आस्थापनेवरीलच सहकारी डॉक्टर फारूक इलाही बागवान यांनी त्यांच्या मोबाईलवर मुद्दामहून फिर्यादीला ऐकू येईल असे “तू चीज बडी है मस्त मस्त” हे गाणे चालू केले त्यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली तसेच त्यानंतर आरोपी डॉक्टर यांनी फिर्यादी बसलेल्या खुर्चीजवळ जाऊन त्यांच्या डाव्या खांद्याला स्पर्श केला व त्यामुळे फिर्यादीने आरडाओरडा करून बचाव केला असताना आरोपीने फिर्यादी महिला डॉक्टरला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व उलट मारण्यास फिर्यादीच्या अंगावर धावून गेले त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी आरोपी पकडून सोडवा सोडवा केली. सदर घटनेची फिर्याद सदर महिला डॉक्टर यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक 8 मार्च 2023 रोजी दिल्याने आरोपी डॉक्टर यांच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 354, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करून जोडभावी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व्ही.एच.पवार यांनी आरोपी डॉक्टरच्या विरुद्ध सोलापूर येथे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक एम रेडकर यांच्या कोर्टामध्ये झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे पीडित महिला डॉक्टर, त्यांचे मामा, घटनास्थळाला हजर असणारे साक्षीदार, पंच साक्षीदार व तपासिक अंमलदार असे एकूण 6 साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती.
सदर खटल्यामध्ये अंतिम युक्तीवाद करत असताना आरोपीतर्फे डॉक्टर तर्फे अँड. रियाज शेख यांनी बाजू मांडली व आरोपीला खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतविलेले आहे, घटनेनंतर २ दिवसांच्या कालावधीनंतर उशिराने फिर्याद दाखल केलेली आहे, घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या साक्षीदारांच्या व फिर्यादीच्या साक्षीमध्ये तफावत दिसून येते, तसेच फिर्यादीने न्यायालया समक्ष दिलेल्या जबाब मध्ये व पोलिसांच्या समक्ष दिलेल्या फिर्यादीमध्ये तफावत असून गंभीर त्रुटी दिसून येत आहेत तसेच फिर्यादीने महिला दिनाचे औचित्य साधून खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, फिर्यादीने तिला उपलब्ध असलेल्या विशाखा समितीकडे कोणतेही दाद मागितलेले नाही, घडलेली घटना हीच मुळात तथ्यहीन असल्याचे दिसून येते पोलिसांनी तपासामध्ये केलेल्या त्रुटींचा फायदा आरोपीला देणे न्यायाच्या दृष्टीने गरजेचे आहे, आरोपी महिला फिर्यादी महिला डॉक्टर हिला वरिष्ठांनी कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल नोटीसा दिलेल्या होत्या त्याचा राग मनात धरून तिने आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दिलेली आहे असा युक्तिवाद करून आरोपीस निर्दोष मुक्त करण्याची मागणी केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक रेडकर साहेब यांनी आरोपी डॉक्टर फारूक इलाही बागवान यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.
सदर खटल्यामध्ये आरोपी डॉक्टर यांच्या वतीने अँड. रियाज एन. शेख यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री आर एस शिंगणापूर यांनी काम पाहिले.