राजकीय

दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा. नाहीतर तुमचाही नेतन्याहू होईल

जेव्हा एक हुकूमशहा लोकशाहीला उखडून फेकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करते तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात व मोदींचे मित्र, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना पळून जावे लागते. त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा. नाहीतर तुमचाही नेतन्याहू होईल, असा इशारा ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

नेत्यानाहू यांना पळून जावे लागले

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, हिंदुस्थान म्हणजे पाकिस्तान नाही व पाकिस्तानप्रमाणे येथे विरोधकांना बेगुमानपणे चिरडता येणार नाही. इस्रायलप्रमाणे येथील जनतादेखील लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. जनतेच्या उद्रेकामुळे इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना पळून जावे लागले. उद्या कदाचित हेच नेत्यानाहू आपले मित्र मोदी यांच्याकडे राजकीय आश्रय मागतील व मोदी त्यांना दिल्लीतील एखादा बंगला बहाल करून कर्तव्यास जागतील, पण राहुल गांधींना मात्र बेघर करतील, नव्हे केलेच आहे. इस्रायल देशात जे घडते आहे, त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा. नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल! देश त्याच दिशेने निघाला आहे.

पाकिस्तानचाच मार्ग स्वीकारणार?

अग्रलेखात म्हटले आहे की, पाकिस्तानात ज्या निर्घृण पद्धतीने राज्य चालविले जाते तीच निर्घृण पद्धत मोदी राज्यात हिंदुस्थानात सुरू झाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याची पूर्ण तयारी झाली आहे, त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवले जात आहे. हे असे सूडाचे निर्घृण राजकारण पाकिस्तानसारख्या देशात परंपरेने चालूच असते. राजकीय विरोधक हा जन्मजन्मांतरीचा शत्रू असल्याचे मानून त्यास खतम केले जाते, पण हिंदुस्थानही पाकिस्तानचाच मार्ग स्वीकारणार असेल तर कसे व्हायचे?

मोदी सरकारचा अतिनिर्घृणपणा

अग्रलेखात म्हटले आहे की, एका मानहानी खटल्यात राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी रद्द व्हावी म्हणून त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली व आता लगेच चोवीस तासांत सरकारने गांधी यांना दिल्लीतील निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावली आहे. एखाद्यात अतिआत्मविश्वास असू शकतो, पण हा इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा, हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे. इंग्रजांचे जुलमी सरकार भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वीर सावरकर अशा क्रांतिकारकांशी ज्या निर्घृण पद्धतीने वागले, त्याच निर्घृण रीतीने मोदींचे सरकार आपल्या राजकीय विरोधकांशी वागत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही काढून घेतले. हा आसुरी आनंद ज्यांना आज झाला आहे, त्यांना भविष्यात कर्माची फळे भोगावी लागतील हे नक्कीच.

मोगलांनीही असे राज्य केले नसेल

अग्रलेखात म्हटले आहे की, इतक्या खुनशीपणाने आपल्या देशात कदाचित मोगलांनीही राज्य केले नसावे. आज संपूर्ण दिल्लीतील अनेक सरकारी बंगल्यांवर भाजप व संघ परिवाराचा अवैध कब्जा आहे. निवृत्त होऊन, पराभूत होऊन कधीच ‘माजी’ झालेल्या भाजप खासदारांनी त्यांचे बंगले सोडले नाहीत. संघ परिवाराच्या संस्था व नेत्यांनी त्यांच्या राजकीय कार्यासाठी सरकारी बंगले मिळवले आहेत, पण राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करताच चोवीस तासांत त्यांना राहते घर सोडण्याचे आदेश दिले गेले. याआधी प्रियंका गांधी यांचेही लोधी इस्टेट परिसरातील घर अशाच पद्धतीने काढून घेतले गेले.

देशाच्या लोकशाहीचा कठिण कालखंड

अग्रलेखात म्हटले आहे की, गौतम अदानी यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मदतीने देश लुटला हे आता उघड झाले आहे. त्यांच्या कोणत्याही संपत्तीवर जप्ती आली नाही. राहुल गांधी यांनी ज्या सर्व ‘मोदीं’चा नामोल्लेख करून त्यांच्या चौर्यकथांचा पर्दाफाश केला त्यांचीही घरे-बंगले शाबूत आहेत, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांची खासदारकी व घरही आता काढून घेण्यात आले. देशाची लोकशाही किती कठीण कालखंडातून जात आहे त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. अदानी यांनी एलआयसी, स्टेट बँकेचे पैसे उडवलेच, पण कष्टकऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजे कर्मचारी भविष्य निधीचे पैसेही मोदी सरकारने अदानी यांच्या खात्यात वळवून हाहाकार माजवला आहे. हा जनतेचा पैसा आहे. या लुटीच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांचा छळ केला जात आहे. देशात अभूतपूर्व अशी अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी किंवा घर काढून घेतले हा तर प्रश्न आहेच, पण त्याचवेळी देशात लोकशाहीचा जो खूनखराबा सुरू आहे तो चिंतेचा विषय आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel