शेतीशी निगडीत कोणत्याच उपकरणांवर जीएसटी लावू नका; किसान सन्मान योजनेवरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणावरील जीएसटी टॅक्स रद्द करावा किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील रक्कम वाढवावी, अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत केली आहे. त्तसेच कृषीमंत्र्यांना भेटून त्यांनी चर्चा करत एक निवेदनही दिले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये मिळतात. दरम्यान, शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांची रक्कम मिळते. मात्र, शेतकऱ्यांच्या टूथपेस्टचा आणि साबणाचा खर्चसुद्धा या रकमेपेक्षा जास्त असतो. शेतकऱ्यांच्या उपकरणांवर किंवा कीटकनाशकांवर 5 टक्क्यांपासून 18% पर्यंत जीएसटी लावण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने एक लाख रुपयांची खते खरेदी केली तर त्याला 18 हजार रुपयांचा जीएसटी सरकारला द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देऊन त्यांच्या खिशातून 18 हजार रुपये वसूल केले जातात. त्यामुळे शेती संबंधित कोणत्याही वस्तूंवर टॅक्स लावू नये, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
तर काही शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेतील पैसे केवायसी अपडेट नसल्यामुळे मिळत नाहीत, अशा शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा. त्याबरोबरच पिक विमा योजना मध्ये प्रत्येक पिकाला पिक विमा योजनेत विमा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तर विमा कंपनीकडून रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
केंद्र सरकारवर टीका
दरम्यान प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीवरून देखील केंद्र सरकारवर टीका केली. आज देखील केंद्र सरकार आंध्रप्रदेश आणि बिहारला विशेष पॅकेज देऊन महाराष्ट्रसहीत इतर राज्यावर अन्याय केला असून भाजपला महाराष्ट्रातील झालेला पराभव पचनी पडला नसल्याचा टोल आहे त्यांनी यावेळी लगावला आहे.