संजय राऊत हे चायनीज मॉडेल- नीतेश राणे
कोकणातील भाजप नेत्याच्या 100 सेल कंपन्या आहेत. त्यात काही हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, नारायण राणे यांचे नाव न घेता असा आरोप आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर लगेच भाजप नेते नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर हल्लाबोल चढवला. संजय राऊत हे चायनिज मॉडेल आहेत. राजकारणासाठी त्यांच्यासारखे माणसं चोरबाजारात स्वस्तात मिळतात, अशी घणाघाती टीका नीतेश राणे यांनी केली.
संजय राऊतांचे आरोप काय?
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच भाजप नेत्याचा हा भ्रष्टाचार पूर्वी समोर आणला होता. त्यांच्या सेल कंपन्या असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या आरोपांची आम्ही चाचपणी केली तेव्हा या नेत्याच्या खरेच 100 सेल कंपन्या असल्याचे आम्हाला समजले आहे. त्यातून काही हजार कोटींचे व्यवहार झाले आहेत. विशेष म्हणजे भाजप नेत्यानेच हा घोटाळा समोर आणला आहे. मात्र, नंतर ते हे मोठे नेते भाजपात गेले. केंद्रीय पदावर गेले. यासोबतच पूर्वी आमच्यासोबत असलेल्या काही आमदारांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्या आरोपांचेही नंतर काय झाले?
नितेश राणेंचे प्रत्युत्तर
संजय राऊत यांची पत्रकार परिषद होताच नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर जोरदार टीका केली. नितेश राणे म्हणाले, संजय राऊतांनी उठसूठ भाजप नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करू नयेत. राऊतांना ही नम्रविनंती आहे. राऊतांनी भाजप नेत्यांवर असेच बिनबुडाचे आरोप सुरू ठेवले तर मीदेखील उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे कपडे काढायला कमी करणार नाही.
तोंड उघडायला लावू नका
नीतेश राणे म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिस किंवा हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जावे. भाजप नेत्यांवर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या फोटोकडे पहावे. कारण आता त्यांनी असे आरोप केले की मी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर तशाच शब्दांत टीका करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अब्रू जावू नये, असे वाटत असेल तर संजय राऊतांनी सांभाळून बोलावे. कारण दिशा सालियन प्रकरणात तर आदित्य ठाकरे यांच्यावर खुनाचा आरोप आहे. उद्धव ठाकरे व त्यांच्या स्वकियावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका.
भ्रष्टाचाराविरोधात एकतर्फी कारवाया
दरम्यान, आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, राज्यात भ्रष्टाचाराविरोधात एकतर्फी कारवाया होत आहेत. काल मी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी कारखान्यात गेले तर पोलिसांनी तिथे कलम 144 लावले. या कारखान्याचे चेअरमन भाजपचे आमदार राहुल कुल आहेत. 42 हजार शेतकरी या कारखान्याचे सभासद आहेत. राहुल कुल यांनी या शेतकऱ्यांची फसवणूक करत 500 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी प्रचंड संतप्त आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सभेला हे हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना न्याय देणार आहेत का?