संभाजी ब्रिगेडचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन…

संभाजी ब्रिगेडचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन
संभाजी ब्रिगेडने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेड विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून त्याची कुख्याती आहे तोच धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळसूत्र चोरचा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकरच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. काही दिवसापासून गोपीचंद पडळकर हे संभाजी ब्रिगेड बद्दल वेगवेगळी वक्तव्य करीत आहेत.
पडळकर हे धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देतो असे जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाहीत, बिरोबाची खोटी शपथ घेऊन भाजपाला मत देऊ नका म्हणणारे आज भाजपचेच काम करत आहेत.
अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करीत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम यांनी केला आहे



