सिद्धरामाच्या नगरीत स्वागत कमानी उभारा; वीरशैव व्हिजनची मागणी
प्रत्येक चौकात मंदिराकडे जाण्याचा मार्ग फलक हवा

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे मंदिर शहरात असल्याचे परगावहून येणाऱ्या भाविकांना माहिती व्हावी यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात याव्यात अशी मागणी वीरशैव व्हिजनतर्फे महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे करण्यात आली.
जर भाविक शहरात आले तर शहराचे पर्यटन वाढणार आहे. आलेले भाविक शहरातील आजूबाजूचे ठिकाणांना भेटी देतील. यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूरच्या विकासास हातभार लागणार आहे.
शहरात अनेक भाविक येतात. ते भाविक पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट व गाणगापूरला जातात. मात्र श्री सिध्देश्वर मंदिराकडे येत नाहीत. कारण त्यांना श्री सिध्देश्वर मंदिराची माहिती नसते. त्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर स्वागतकमानी उभारून त्यावर श्री शिवयोगी सिध्देश्वर पावन नगरीत हार्दिक स्वागत असे नमूद करावे. हिच मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मेलद्वारे करण्यात आली आहे. तसेच सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयासही देण्यात आले.
तसेच शहरातील प्रत्येक चौकामध्ये श्री सिध्देश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग असे लिहिलेले फलक उभे करावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे. प्रारंभी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महापौर कोंड्याल यांनी येणाऱ्या महापालिकेच्या सभेत हा विषय मांडला जाईल. त्यावर सर्वानुमते निर्णय घेतला जाईल असे आश्वस्त केले.
यावेळी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, युवक आघाडी अध्यक्ष सोमनाथ चौधरी, सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी, कार्यकारणी सदस्य योगेश कापसे, नागराज कोंडे कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, बसवराज चाकाई, कार्तिक स्वामी, लोकेश इरकशेट्टी व अजिंक्य कटाप उपस्थित होते.
फोटो ओळी : वीरशैव व्हिजनतर्फे सिद्धरामाच्या नगरीत स्वागत कमानी उभारण्याचे निवेदन महापौर विनायक कोंड्याल यांना देताना विजयकुमार बिराजदार राजशेखर बुरकुले, सोमनाथ चौधरी, अमित कलशेट्टी, योगेश कापसे, नागराज कोंडे



