सुवर्णपदक ओम राजेश अवस्थी यांच्या नावावर!
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात तिकीट निरीक्षक पदावर कार्यरत असणारा ओम राजेश अवस्थी याने सोलापूर रेल्वे विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ओम याने ७७व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये पुरुष प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारात भारतीय रेल्वेसाठी दशकानंतर सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय रेल्वेचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक हरीश अण्णालदास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या ओम याने त्यांच्या असाधारण कौशल्याने आणि अचूकतेने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचा खेळ खरोखरच सर्वांपेक्षा वेगळा आणि अव्वल होता.
ओम यांने आपल्या खेळाने नेहमीच सर्वांना प्रभावित केले आहे, त्यामुळेच त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नेहमीच खेळासाठी प्रोत्साहन मिळत आले आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक पदके जिंकली आहेत. या खेळाडूंचे झोनल पातळीवर कौतुक करण्यात आले आहे तर सोलापूर विभागाचे, विभागीयी रेल्वे व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहरे आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. योगेश पाटील यांनी विशेष कौतुक केले आहे.
डायविंग – प्लॅटफॉर्म इव्हेंटमध्ये सुवर्णपदक मिळवणारे ओम अवस्थी याला सराव करत असताना अनेकदा गंभीर दुखापती झाल्या, परंतु त्याने हार मानली नाही आणि अखेरीस हे यश मिळवले. येणाऱ्या काळात जागतिक पातळीवर मध्य रेल्वेचे नाव उज्वल करण्याचा मानस त्यांने व्यक्त केला आहे.