सोलापुरात कर्ज वसुलीसाठी अपहरण , मृत्यूस कारणीभूत प्रकरणांत श्रीनिवास सांगा निर्दोष…
सोलापूर येथील एक उद्योजक श्रीनिवास किशोर संगा वय ३५, रा. सोलापूर याची त्याने एका व्यापारास कर्ज वसुलीसाठी वारंवार त्रास देऊन त्यास हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यु होण्यास कारणीभूत झाल्याचे आरोपातून सोलापूर येथील सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
याची थोडक्यात हकीकत अशी की, मयत व्यापाराने सदर उद्योजकाकडून एका व्यापारी मध्यस्थांमार्फत ७ लाख रुपये कर्ज घेतले होते. ते वेळेत परत करण्याचे होते. तथापि, ते वेळेत परत केले नाही. म्हणून आरोपी श्रिनिवास संगा याने त्यास वारंवार त्रास, धमक्या दिल्या व तसेच दि.०१/०९/२०१६ रोजी त्यांचे अपहरण करून, त्यांना कोंडून ठेवून प्रचंड त्रास दिला व त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यु झाला अशा आशयाची फिर्याद त्यांच्या मुलाने दाखल केली होती, त्याप्रमाणे गुन्हा नोंद होऊन त्याचा तपास पोलीस अधिकारी एस.एस. बनकर यांनी करून न्यायालयात आरोपीविरुध्द आरोपपत्र पाठवले. त्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात झाली. त्यामध्ये सरकार पक्षाने महत्त्वाचे एकूण ९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मयताची कुटुंबातील व्यक्ती, पंच, लॉज, साक्षीदार, पोलीस अधिकारी यांच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या व त्यामध्ये उद्योजकाने कशा प्रकारे त्रास देऊन हृदयविकाराने मयताचा मृत्युस कारणीभूत झाला याबाबत साक्षी दिल्या.
त्यामध्ये आरोपीचे वकील अॅड. शशी कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, मयत प्रसाद यांचा मृत्यु हा आरोपीने दिलेल्या तथाकथित त्रासामुळे झाला असे वैद्यकीय मत कोणीही दिले नाही. आरोपी व मयत यांच्या व्यवहाराची कोणतीही कागदपत्रे कोर्टासमोर नाही. आरोपीचे अपहरण करुन त्यास कोंडून ठेवले याबद्दलही कोणताही स्पष्ट पुरावा नाही, त्यामुळे आरोपीबद्दल कोणताही गुन्हा सिध्द होत नाही. त्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता व्हावी असा युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद विचारात घेऊन अति सत्र न्यायाधिश श्रीमती. ई.आ. शेख/नजीर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. सचिन कोळी, अॅड. देवदत्त बोरगांवकर, अॅड, रणजित चौधरी, अॅड. प्रणव उपाध्ये, अॅड, आदित्य आदोने यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे अॅड. के.ए. बागल यांनी काम पाहिले.