पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती सह तिघे निर्दोष

पुतळाबाई शिवराज मलगोंडा वय 27 हिचा खून केल्याप्रकरणी पती शिवराज बसवराज मलगोंडा वय 29 दीर देवराज बसवराज मलगोंडा वय 37 जाऊ गंगोत्री देवराज मलगोंडा वय 33 सर्व राहणार अक्कलकोट यांची प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांनी निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की, मयत पुतळाबाई हिचे लग्न आरोपी शिवराज याच्याबरोबर झाले होते. लग्नानंतर पुतळाबाई हीस काही दिवस व्यवस्थित नांदविले. आरोपींकडे मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी होती. आरोपी शिवराज यास दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्या प्रॉपर्टी चे कामकाज मयताचा दिर देवराज पाहायचा. मयत पुतळाबाई, तिचा पती, दीर व जाऊ यांच्यामध्ये प्रॉपर्टी वरून कायम वाद होत होते. सर्व आरोपी हे मयत पुतळाबाई हिस मारहाण करून तिचे चारित्र्यावर संशय घेत होते. मयताने मारहाणीबाबत दिनांक 25. 6 .2021 रोजी पोलिसात फिर्याद दिली होती त्यानंतर ती माहेरी गेली होती. दिनांक 28/6/2021 रोजी ती परत सासरी आली. दिनांक 30/06/2021 रोजी आरोपी शिवराज याने मयतास चहा पिण्याच्या कपात झोपेच्या गोळ्या दिल्या त्यानंतर तिच्या तोंडावर ऊशिने दाब देऊन तीस जीवे ठार मारले,अशा आशयाची फिर्याद मयताचा भाऊ बसवराज मल्लिनाथ शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली होती.त्यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात आरोपी हे घटने दिवशी घरात होते, याबाबतचा पुरावा सरकारी पक्षाने शाबित केला नाही, त्यामुळे आरोपींनी गुन्हा केला असे म्हणता येणार नाही, असा मुद्दा मांडला, तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे, एडवोकेट विनोद सूर्यवंशी, एडवोकेट दत्ता गुंड, एडवोकेट निशांत लोंढे, एडवोकेट अमित सावळगी यांनी तर सरकार तर्फे एडवोकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले.