सोलापुरात तब्बल 8 तोळ्यांसह रकमेची चोरी !!!
मुलगा बारावीच्या परीक्षेला गेला. नातेवाईक आजारी असल्यामुळे आई त्यांना भेटण्यासाठी गेली. घर बंद असल्याची संधी साधून विजापूर रोड, राजस्व नगरातील एका घरात चोरी झाली आहे. तब्बल आठ तोळे दागिने आणि ३५ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. श्रीमती अर्चना संजय पवार (रा. राजस्व नगर, विजापूर रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत १८ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत घडला. घराचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील दागिने नेले आहेत. दुपारी तीन वाजता परीक्षा देऊन घरी आल्यानंतर कडी कोयंडा उचकटल्याचे मुलाला दिसले. त्याने आईला घटनेची माहिती दिली. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती दिली. पोलिस आले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि रेकॉर्डवरील कोण आहेत का याबाबत चौकशी सुरू असल्याचे फौजदार मुरकुटे यांनी सांगितले. तीन अंगठ्या, छोटी अंगठी, मणिमंगळसूत्र, फॅन्सी मंगळसूत्र, लॉकेट, सोन्याचे पेंडल मणी आणि ३५ हजार रुपये असा ३ लाखाचा ऐवज गेला.