सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांचा दिल्लीमध्ये सन्मान…
पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाकडून गौरव

शहरातील प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांचा भारतीय चित्रशैली योगदानाबद्दल मथुरा (उत्तर प्रदेश) येथील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाकडून नुकताच नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला. नवी दिल्लीच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये झालेल्या कार्यक्रमात कुलपती अरविंद कुमार ठाणे इंद्र भूषण मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पंडित दिनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाने राष्ट्रीय हिंदी संगोष्टी समारोहाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यालयाचे माजी कुलगुरू अरविंद कुमार यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित दिनदयाल विद्यापीठाचे कुलपती इंद्रभूषण मिश्रा होते. चित्रकार सचिन खरात यांनी भारतीय चित्रशैलीच्या माध्यमातून रेखाटलेली चित्रे देश परदेशात पोहोचली आहेत. यामुळे भारतीय चित्रशैलीचा गौरव झाला आहे. सोलापूर सारख्या छोट्या शहरातून येणाऱ्या कलाकाराने उत्तम काम केले आहे. या योगदानाबद्दल खरात यांचा गौरव करण्यात येत असल्याचे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले.
दरम्यान, सचिन खरात म्हणाले, भारतीय चित्रशैलीची अनेकांना भुरळ पडलेली आहे. माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानले.



