सोलापूर – अरे व्हा! बारावी परीक्षेत तृतीयपंथीला मिळाले यश…
सोलापूर ( प्रतिनीधी):- सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 12 आणि 10 परीक्षांचे निकाल लागले असताना अनेक जण आपल्या मुलांनी परीक्षा चांगल्या प्रकारे देऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल मुलांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे… कोणाचा मुलगा तर कोणाची मुलगी या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने पालकांनी सुद्धा समाधान मानत असतानाच सोलापूर शहरात एका तृतीय पंथीयांनी सुद्धा बारावी परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी या तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा कौतुक केला जात आहे…
जीवनात वावरत असताना सर्वांना समान अधिकार आहे असे नेहमी म्हटले जाते, परंतु काही वेळा पुरुष स्त्री, उच्च , नीच, गरीब श्रीमंत, धर्मभेद, जात-भेद यावरून वाद झालेले अनेक विषय नेहमी समोर आले आहेत. त्यात मुलगा आणि मुलगी मध्ये भेदभाव करणारे लोक तर तृतीय पंथीय समाजाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच वाईट राहिलेला आहे. या सर्वांच्या पलीकडे आहे तो एक वेगळा प्रश्न ज्याकडे सर्व मानव जातीने प्रेमाने, आपुलकीने पाहिले पाहिजे. ते म्हणजे तृतीयपंथीय, होय तृतीपंथीय….
नैसर्गिक दृष्ट्या त्यांच्यावर ओढवलेली आपत्ती पाहता त्यांना सहानुभूतीने पहात, त्यांना समाजात उंच मानेने जगण्यासाठी मदत व्हावी अशीच अपेक्षा तृतीयपंथीयांची असते. अशा सर्व परिस्थितीतून यशाचे शिखर गाठत काहीतरी करून दाखवण्याची मानसिकता उराशी बाळगत आज बारावी परीक्षेत एका तृतीयपंथीयांनी यश गाठले, मग त्याचे कौतुक तर नक्की झाले पाहिजे.
सोलापूर शहरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या रवींद्र उर्फ प्रीती नागटिळक सिग्नलवर पैसे कमावणारे तृतीयपंथी मधील एक. बारावी मध्ये 49 % टक्के मार्क थेट उत्तीर्ण होत पोलीस भरती होण्याचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत त्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
आयुष्यात खडतर प्रवास करत दहा वर्षापूर्वी सुटलेला अभ्यास पुन्हा उरी बाळगून कुटुंब व मित्रांच्या पाठिंबामुळे पुन्हा पोलीस भरतीचे स्वप्न पाहणे शक्य झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असणाऱ्या कडबगाव (अक्कलकोट स्टेशन) येथील सिध्दाराम म्हैत्रे ज्युनियर काॅलेज मधे अक्कलकोटचे प्रा.सुर्यकांत कडबगांवकर व कोन्हळीचे शिक्षक मल्लय्या हिरेमठ यांच्या सहकार्याने प्रवेश मिळवला. प्राचार्य कंचनाळ सर व कडबगांवकर सर यांचा मार्गदर्शन मिळाला .सिग्नल वर पैसे मागणे तर रात्रीच्या वेळी अभ्यास करुन बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. सद्यःस्थितीला स्वकष्टावर पोलीस भरतीचा सराव करत असून समाजाच्या पाठिंब्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र मार्फत सराव करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सिग्नल वर पैसे मागणारा हा तृतीयपंथी आज शैक्षणिक क्षेत्राकडे मोठ्या आशेने वळत असून समाजाने याला स्वीकारले पाहिजे त्याचबरोबर तृतीयपंथांना समाजामध्ये ताठ मानेने जगण्याचा अधिकार आम्हालाही असून आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलण्याची व समाजामध्ये स्थान निर्माण करण्याची संधीची गरज असल्याचे मत यावेळी तृतीयपंथीयांनी व्यक्त केली.
सदर विद्यार्थ्याने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच समाजातील नागरिकांनी त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे..