सोलापूर बाजार समितीला 2.63 कोटी घाटा
सोलापूर बाजार समितीला कांद्याच्या दरात घसरण झाल्याचा फटका बसला आहे. मागील वर्षी सोलापूर बाजार समितीला एकूण २५ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. १७.८५ कोटी खर्च वजा जाता ७ कोटी ३५ लाख रुपयांचा नफा (वाढावा) मिळाला होता. यंदा २२ कोटी २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून त्यातून १७.५० कोटी रुपये खर्च वजा जाता ४.७२ कोटी रुपयांचा नफा (वाढावा) मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २ कोटी ६३ लाख रुपयांचा तोटा झाला आहे.
सोलापूर बाजार समितीची बैठक सभापती विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक बाळासाहेब शेळके, जितेंद्र साठे, प्रकाश वानकर, अमर पाटील, राजू वाघमारे, बसवराज इटकळे, केदार उंबरजे, प्रकाश चौरेकर, लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख, सचिव सी.ए. बिराजदार आदी उपस्थित होते. बँकातील मुदत ठेवीस मुदतवाढ देणे, झेरॉक्स मशीन दुरुस्ती, रजा मंजूर, परवाने नोंदणी करणे यासह विषय पत्रिकेवरील २२ विषयांना मंजुरी देण्यात आली. मुदतवाढीबाबत अद्याप कोणतेही पत्र वा आदेश अद्याप आले नाहीत तर दुसरीकडे प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मुदतवाढ न मिळाल्यास संचालक मंडळाची ही शेवटची बैठक असणार आहे.
लेखापरीक्षकांच्या कानपिचक्या
पुणे येथील विभागीय सहनिबंधक तथा लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख यांची सभेस उपस्थित होती. सभेत संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना सूचनाही केल्या. बाजार समितीच्या १०० कोटींच्या ठेवीबद्दल संचालक मंडळाचे कौतुक करत मुंबई बाजार समितीपेक्षाही अधिक ठेवी आहेत. पण नफ्यातून शेतकऱ्यांना सुविधा द्या, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करा, कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवा, आवारात सीसीटीव्ही बसवा, कामांमध्ये ज्या त्रुटी आहेत त्यात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.
२२ पैकी १० कोटी वेतनावरच खर्च
बाजार समितीला २२.२३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून त्यापैकी ४० टक्के म्हणजेच १० कोटी रुपये रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होते. शिवाय विकासकामे, इतर खर्चावर ३० टक्के खर्च केला जातो. एकूण उत्पन्नात परवाने नूतनीकरण, सेस व ठेवीवरील व्याज याचा समावेश आहे. बाजार समितीच्या बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, युनियन बँक या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये १०० कोटी १६ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. त्या ठेवीतून बाजार समितीला वार्षिक ६ कोटी रुपयांचे व्याज मिळते.