Tesla In India : टेस्लाचा भारतात येण्याचा निर्णय, पाच वर्षांची गुंतवणूक योजना तयार

नवी दिल्ली : एकीकडे भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प हे राज्याच्या बाहेर जात असल्याची बातमी वारंवार समोर येत आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प असो, किंवा डायमंड बोर्स असो यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आहेत.
ज्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली. पण आता जगातील सुप्रसिद्ध अशी इलेक्ट्रिक कार टेस्लाने भारतात येण्याचा म्हणजेच भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्लाने भारतात गुंतवणूक करण्यासाठी सुमारे 30 अब्ज डॉलर्सची योजना तयार केली आहे. तर, भारतासाठी 5 वर्षांची गुंतवणूक योजना देखील टेस्ला कंपनीकडून तयार करण्यात आली आहे. पण आता केवळ केंद्र सरकारच्या नव्या ईव्ही धोरणाची वाट पाहण्यात येत आहे. (Tesla’s decision to come to India, five-year investment plan ready)
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीने भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. टेस्लाकडून भारतात मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. टेस्ला आपल्या प्लांटमध्ये सुमारे 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. याशिवाय त्याच्या संलग्न कंपन्या भारतात सुमारे 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर, बॅटरी विभागात सुमारे 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे, जी कालांतराने सुमारे 15 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. आम्हाला पूर्ण आशा आहे की टेस्ला सुमारे 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल, असेही आता सांगण्यात येत आहे.
परंतु, केंद्राच्या ईव्ही धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. मोदी सरकारकडून हे धोरण लवकरच अंमलात आणण्यात येणार आहे. हे धोरण टेस्लाला भारतात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच, नव्या धोरणात परदेशात बनवलेल्या ईव्हीवरील आयात शुल्क कमी केल्यास टेस्ला भारतात येण्याच्या आपल्या योजनांना गती देईल. महत्त्वाची बाब म्हणजे, टेस्लाचे मालक एलन मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांचे एलन मस्क यांच्याकडून कायमच कौतुक करण्यात येत असते. एलन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मागच्याच वर्षी जूनमध्ये न्यूयॉर्कमध्ये भेट झाली होती. त्यावेळी मस्क यांना पंतप्रधान मोदी यांनी भारतात गुंतवणूक केल्याचे आवाहन केले होते, अशी माहिती स्वतः एलन मस्क यांच्याकडून देण्यात आली होती. त्यामुळे आता लवकरच टेस्लाचे दरवाजे भारतासाठी खुले होणार आहे. ज्यानंतर ही सर्वात मोठी गुंतवणूक भारतात करण्यात येणार आहे.