सोलापूर महापालिकेने पावसाळापूर्व कामे त्वरित पूर्ण करावती आ. सुभाष देशमुख यांचे अधिकार्यांना आदेश
सोलापूर :- जून महिन्यापासून पाऊस सुरू होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे महापालिकेने सतर्क रहावे, लवकरात लवकर नालेसफाई, डे्रनेज लाईन सफाईसह पावसाळीपूर्व कामे करावीत, असे आदेश आ. सुभाष देशमुख यांनी महापालिका अधिकार्यांना दिले आहेत.
आ. सुभाष देशमुख यांनी गुरूवारी मनपा अधिकार्यांसमवेत बैठक घेवून पावसाळापूर्व कामाचा आढावा घेतला. शहर दक्षिण मतदारसंघातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्या संबंधीची सूचना त्यांनी अधिकार्यांना केली.
आ. देशमुख म्हणाले, शहर दक्षिण मतदारसंघात योग्य दाबाने नियोजित वेळेत पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच अनेक ठिकाणी नविन विद्युत खांब उभे करण्यात आले आहेत अशा ठिकाणी लाईडी बसवावेत, हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरण्याची शक्यता असते अशा ठिकाणी स्ट्रॉम वॉटर लाईन करून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन खराब अथवा निकामी झाली आहे अशा ठिकाणी चेंबर कव्हर बसवून लेव्हल करावे, सार्वजनिक आरोग्यचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी प्रामुख्याने स्वच्छता राखली जावी यासाठी हद्दवाढ भागातील नाले व खुल्या गटारांची स्वच्छता, नालासफाई करून पाणी तुंबणार नाही याची व्यवस्था लावावी, आवश्यक असेल त्या ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी करणे, सार्वजनिक शौचालयांची वेळोवेळी स्वच्छता व निगा राखावी, रस्त्याच्याकडेला मोकळ्या जागी साठणार्या कचर्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ करावा, तसेच प्रताप नगर व लोकु तांडा भागातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून ते शेतात जाणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले.
पावसाळ्यात रस्त्यालगत व दुभाजकांमधील वाढणारी काटेरी झुडपे काढून टाकाणे, कच्च्या रस्त्यावर मुरूर टाकून वाहतुकीस रस्ता सुरक्षित करणे, मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यावर उपायोजना करून पावसाळ्यात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचीही सूचनाही आ. देशमुख यांनी दिल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपआयुक्त भगत, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, शहर दक्षिण मतदारसंघातील मनपाचे विभागिय अधिकारी, इंजिनियर, मनपा लाईट विभागचे कर्मचारी उपस्थित होते