सोलापूर विमान तळाला श्री स्वामी समर्थांचे नाव द्या अजित दादांकडे महेश कुलकर्णी यांची मागणी
राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांच्या ४० टक्के अनुदान वाढीचा निर्णय घ्या राष्ट्रवादीचे कुलकर्णी यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी...
स्वामी समर्थ हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे सोलापूर विमानतळाला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव देण्यात यावे,त्याच सोबत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या 40% अनुदान वाढीचा निर्णय तातडीने घेऊन ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा या मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुलकर्णी यांनी अजित दादांची मुंबईत भेट घेऊन उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अजित पवार यांच्याकडे देऊन ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना साकडे घातले. राज्यात ११ हजार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांमध्ये जवळपास २० हजार कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असून त्यांच्या कुटुंबाची उपजिविका भागविण्या इतपतसुध्दा त्यांना मानधन मिळत नाही.आर्थिक परिस्थिती बिकट असूनही अशा परिस्थितीत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांतील २० हजार कर्मचारी ग्रंथालयामध्ये काम करत आहेत. त्यामुळे ग्रंथालयांचे अनुदान वाढ करून दर्जा बदल, नवीन ग्रंथालयास मान्यता देणे व केंद्र शासनाचा निधी प्रत्येक ग्रंथालयास देण्या संदर्भातच्या प्रस्तावासही मंजुरी मिळावी. तसेच राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे ४० टक्के अनुदान
वाढीचा निर्णय तातडीने घेणेत यावा, याबाबत महेश कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.यावेळी शरद येच्चे उपस्थित होते.